भुयारी केबल टाकण्याच्या कामाचा नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:07+5:302021-06-09T04:39:07+5:30
रत्नागिरी : शहरानजीकच्या शिरगाव शिवरेवाडी गावात महावितरणाच्या भुयारी केबल टाकण्याच्या कामामुळे आता ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
रत्नागिरी : शहरानजीकच्या शिरगाव शिवरेवाडी गावात महावितरणाच्या भुयारी केबल टाकण्याच्या कामामुळे आता ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या तोंडावर ग्रामस्थांनी विरोध करूनही चर खोदण्याचे काम सुरू ठेवले होते. केबल टाकून झाल्यानंतरही हे चर नीट बुजविले नसल्याने त्या ठिकाणी वाहने रुतण्याचे प्रकार घडू लागले आहेत़
वादळी पावसावेळी चरातील माती रस्त्यावर येऊन चिखल झाल्याने वाहतूक बंद होती. कंत्राटदाराने केबल टाकून झाल्यावर चर व साईडपट्ट्या नीट भरणे आवश्यक होते़ परंतु, खडी-मातीने वरवर बुजविण्यात आले होते. पण, एवढे होऊनही त्या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. पण, तसे न केल्यामुळे मंगळवारी सायंकाळी शिरगाव मराठी शाळेजवळ डम्पर जात असताना साईडपट्टीत त्याच्या मागच्या बाजूचे चाक रुतल्याने तो अडकून बसला आहे. कंत्राटदाराने केलेल्या या कामामुळे व आता पावसाळा सुरू झाल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित कंपनीने खोदलेला रस्ता व्यवस्थित करून द्यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
------------------------------
रत्नागिरी शहरानजीकच्या शिरगाव शिवरेवाडी येथे डम्पर रुतून बसला आहे़