कोकणात शिवसेनेला धक्का, मंडणगडातील शहर विकास आघाडीचे नगरसेवक शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 06:49 PM2022-07-16T18:49:00+5:302022-07-16T18:49:36+5:30

नगरपंचायत विरोधी गटनेते विनोद जाधव यांनी दुजोरा दिला

City Development Aghadi councilor from Mandangad in Chief Minister Eknath Shinde group | कोकणात शिवसेनेला धक्का, मंडणगडातील शहर विकास आघाडीचे नगरसेवक शिंदे गटात

कोकणात शिवसेनेला धक्का, मंडणगडातील शहर विकास आघाडीचे नगरसेवक शिंदे गटात

googlenewsNext

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शहरातील शिवसैनिकांच्या शहर विकास आघाडीतील आठ लोकनियुक्त व एक स्वीकृत अशा ९ नगरसेवकांनी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आपण शिंदे गटात सहभागी होत असल्याचे जाहीर केले.

मुंबईत झालेल्या या भेटीबद्दल नगरपंचायत विरोधी गटनेते विनोद जाधव यांनी दुजोरा दिला आहे. या भेटीसाठी गटनेते विनोद जाधव यांच्यासह नगरसेविका वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, सेजल गोवळे, योगेश जाधव, नीलेश सापटे, आदेश मर्चंडे, मुश्ताक दाभीळकर, स्वीकृत नगरसेवक प्रवीण जाधव यांच्यासह उपशहर प्रमुख नीलेश गोवळे, चेतन सातोपे, प्रतीक पोतनीस, विनीत रेगे, नरेश बैकर उपस्थित होते.

शहर विकास आघाडीच्या नावाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या या आघाडीच्या हातातून सत्ता थोडक्यात निसटली. त्यामुळे अनुकूल जनमत असतानाही विरोधात बसावे लागलेले आहे. महाविकास आघाडी व शहर विकास आघाडी यांचे प्रत्येक आठ नगरसेवक निवडून आले हाेते. मात्र, चिठ्ठीच्या मदतीने निवडून आलेल्या नगरसेविकेने महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कौल दिल्याने शहर विकास आघाडी सत्तेपासून वंचित राहिली.

आमदार याेगेश कदम एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर त्यांचे समर्थकही शिंदे गटाच्या दिशेने चालू लागले आहेत. शहर विकास आघाडीने शिंदे गटाचे अधिकृतपणे समर्थन केले आहे. त्यातच महाविकास आघाडीतील विद्यमान सत्ताधाऱ्यांना आगामी कालखंडात राज्याकडून आपणास कोणतीही विशेष मदत होणार नसल्याची चुणूकही मिळाली आहे. शिंदे गटाचे समर्थन करून शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आपला राजकीय विजनवास संपुष्टात आणत सत्तेच्या दिशेने पाऊल टाकल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: City Development Aghadi councilor from Mandangad in Chief Minister Eknath Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.