राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 12:55 PM2021-06-17T12:55:12+5:302021-06-17T12:57:12+5:30
Rain Rajapur Ratnagiri : बुधवारी दुपारपासून संततधारेने कोसळणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जवाहर चौकात पुराचे पाणी भरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राजापूर : बुधवारी दुपारपासून संततधारेने कोसळणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जवाहर चौकात पुराचे पाणी भरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या आठवड्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, त्यावेळी राजापूर तालुक्यात पावसाने उसंत घेतली होती. काही ठिकाणी पावसामुळे किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या होत्या. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत थोडीशी वाढ झाली होती. मात्र, बुधवारी सकाळपासून पावसाने जोर धरत दुपारनंतर जोरदारपणे पडलायला सुरुवात केली आहे.
बुधवारी सायंकाळी कोदवली व अर्जुना नदीच्या पाणीपातळीत मोठ्याप्रमाणावर वाढ झाली होती. रात्रभर पावसाने उसंत न घेतल्याने मध्यरात्री राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे नदीशेजारील काही दुकानांमध्ये पाणी भरले आहे. शहरात पुराची शक्यता असल्यामुळे बुधवारी सायंकाळीच बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षितस्थळी हलवला होता.
मुसळधार पावसामुळे शहरातील चिंचबांध रस्ता, गुजराळी रस्ता, शिवाजीपथ रस्ता पाण्याखाली गेला आहे. मध्यरात्री राजापूर शहरातील जवाहर चौकात स्तंभापर्यंत पाणी भरले होते. सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.