सेना नगरसेवकांचा नगराध्यक्षांना घेराव
By admin | Published: December 12, 2014 10:38 PM2014-12-12T22:38:32+5:302014-12-12T23:32:08+5:30
रत्नागिरी नगरपरिषद : सभेत गदारोळ, शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने, सत्ताधाऱ्यांनीच मागितले मतदान
रत्नागिरी : नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनीच ठरावावर मतदान मागून नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांना कोंडीत पकडले. गाळा दुरुस्ती आणि पथदिव्यांच्या निविदा काढण्यावरुन सत्ताधाऱ्यांनी नगराध्यक्षांना आसनासमोर घेराव घालून मतदानाची मागणी केली. त्यामुळे आज झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेना-भाजपा युतीतील मतभेद चव्हाट्यावर आले.
नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आज शुक्रवारची सभा जोरदार गाजली. यावेळी दि. २५ आॅगस्ट २०१४ च्या सभेतील विषय क्रमांक १०८ मधील ठराव क्रमांक २,३,४ वरुन सभागृहात शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांनी जोरदार हंगामा केला. माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, अशोक मयेकर व नगरसेवक भय्या मलुष्टे यांनी यावेळी गाळ्याच्या अंतर्गत दुरुस्तीवर नगर परिषदेने खर्च उचलण्याबाबतचा ठराव नामंजूर करण्याची मागणी केली. त्यावर नगरसेवक उमेश शेट्ये यांनी ठराव मंजूर करण्याची मागणी केली. या मागणीवरुन सत्ताधारी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या ठरावावर मतदान करण्याची कीर, मलुष्टे यांनी मागणी केल्यानंतर बऱ्याच वेळानंतर नगराध्यक्षांनी मागणी मान्य केली. त्यानंतर झालेल्या मतदानामध्ये ठरावाच्या बाजूने १२ विरुध्द १७ असे मतदान झाले. त्यामुळे २, ३, ४ हे अंदाजपत्रकातील विषय नामंजूर करण्यात आले.
शहरात पथदीप लावण्याबाबत एकाच कंपनीला काम न देता निविदा काढण्याची मागणी नगरसेवक बंड्या साळवी, भय्या मलुष्टे, मिलिंद कीर यांनी नगराध्यक्षांकडे केली. मात्र, नगराध्यक्षांनी निविदा कशाला, उगाच विरोधाला विरोध कशाला करताय, असे विधान करताच शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर निविदा काढण्याची मागणी करीत सेनेच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घेराव घातला. निविदा काढण्यावरुन सभागृहात जोरदार गोंधळ माजला होता. यावरुन सभागृहात कामकाज सुमारे १५ मिनिटे सेनेच्या नगरसेवकांनी रोखून धरले होते. अखेर नगराध्यक्षांनी निविदा काढण्याचे मंजूर केल्यानंतर नगरसेवक शांत झाले. (शहर वार्ताहर)