चिपळुणात महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटात हाणामारी, पोलीस येताच केलं पलायन
By संदीप बांद्रे | Published: September 20, 2022 07:03 PM2022-09-20T19:03:01+5:302022-09-20T19:03:31+5:30
या परिसरात क्षुल्लक कारणातून मारामारीचे प्रकार वारंवार घडत असल्याची चर्चा
चिपळूण : शहरातील एका महाविद्यालयातील तरुणांच्या दोन गटात राडा झाल्याची घटना मंगळवारी (२० सप्टेंबर) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई-गोवा महामार्गावर शिवसेना शहर प्रमुखांच्या संपर्क कार्यालयासमोर हा प्रकार सुरु होता. मात्र, पोलीस येताच सर्वच तरुणांनी तेथून पलायन केले. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात दोन गटात मारामारी झाली होती.
मुंबई-गोवा महामार्गावर ओझरवाडी येथे मंगळवारी दोन गटात क्षुल्लक कारणातून राडा झाला. नजीकच्या एका महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. त्यानंतर हे दोन गट थेट महामार्गावर आले. त्याठिकाणी दोन्ही गटांनी एकमेकास शिविगाळ करत दगडफेक सुरु केली. अशातच पोलिसांना ही माहिती समजल्यावर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलीस येत असल्याचे पाहून सर्वच तेथून पसार झाले.
विशेष म्हणजे याच परिसरात दोन महिन्यांपूर्वी दोन गटात मारामारी झाली होती. पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याने त्यांनी सर्व तरुणांना पोलीस स्थानकात आणले होते. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात आले व शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना समज देत सोडून देण्यात आले होते.
या परिसरात क्षुल्लक कारणातून मारामारीचे प्रकार वारंवार घडत असल्याची चर्चा आहे. यापूर्वी असे प्रकार क्वचितच होत असत. सद्यस्थितीत असे प्रकार वाढले असून, याची कल्पना महाविद्यालयीन प्रशासनास नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.