दहावी, बारावीचा निकाल २२ टक्के
By admin | Published: November 25, 2014 10:30 PM2014-11-25T22:30:07+5:302014-11-26T00:01:25+5:30
शिक्षण मंडळ : गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढली
टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सप्टेंबर/आॅक्टोबर २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचा आॅनलाईन निकाल दुपारी १ वाजता जाहीर झाला. कोकण विभागीय परीक्षा मंडळाचा दहावीचा निकाल २२.४८%, तर बारावीचा निकाल २२.३४% लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे.
दहावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातून ७७८ विद्यार्थी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी रत्नागिरीमधून १८२ विद्यार्थी, तर सिंधुदुर्गमधून ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेच्या शेकडा प्रमाणामध्ये रत्नागिरीने बाजी मारली असून, २३.३९ टक्के विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यातून उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लागला असून, सर्वांत कमी निकाल कोकण विभागाचा लागला आहे.
दहावीच्या परीक्षेमध्ये ८३७ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे शेकडा प्रमाण २२.३४% इतके आहे. सर्वात कमी निकाल एमसीव्हीसी शाखेचा लागला आहे. या शाखेतील ३४ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेच्या २२६ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी २८ विद्यार्थी, कला शाखेचे ३३४ पैकी ६६ विद्यार्थी, तर वाणिज्य शाखेचे २४३ पैकी ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली असून, मुलींपैकी ७४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ५८३ मुलांपैकी ११३ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. (वार्ताहर)
मागील तीन वर्षांतील सर्वाधिक निकाल
कोकण विभागाचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१४ चा निकाल हा मागील तीन वर्षातील सर्वाधिक निकाल आहे. दहावीचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१२ मध्ये ११.४४%, तर सप्टेंबर/आॅक्टोबर २०१३ मध्ये ११.४५% निकाल लागला होता. यावर्षी या निकालामध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. बारावीचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१२ चा निकाल १८%, तर सप्टेंबर/आॅक्टोबर २०१३ चा निकाल १६.३% लागला होता. यावर्षी या टक्केवारीत जवळपास ६ टक्क्यानी े वाढ झाली आहे.
निकालाचा दर्जा वाढवण्यासाठी
प्रयत्न करणार : आर. बी. गिरी
या परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचाल जोमाने करावी, त्यांना मिळालेले हे यश त्यांच्या अविरत प्रयत्नांचे फळ आहे. तसेच अयशस्वी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न करावेत, असे मत कोकण विभागीय मंडळाचे सचिव आर. बी. गिरी यांनी व्यक्त केले. भविष्यात निकालाचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.