मातीच्या ढिगारा कोसळुन कामगाराचा मृत्यू
By admin | Published: June 12, 2017 01:17 AM2017-06-12T01:17:15+5:302017-06-12T01:17:15+5:30
एक गंभीर; दापोलीतील दुर्घटना
दापोली : शहरातील अर्बन सीनियर सायन्स कॉलेजशेजारी रस्त्यालगत एका इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करून संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून एक मजूर ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. रियाज मौलासाब शिरणाळ (वय २५, रा. उकली, ता. बसवण्ण बागेवाडी, जि. विजापूर, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे, तर इस्माईल मुल्ला असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली.
दापोली शहरातील अर्बन सीनियर सायन्स कॉलेजशेजारी व्यावसायिक संतोष चव्हाण यांच्या इमारतीचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करून संरक्षक भिंतीचे काम सुरू होते. याचवेळी जेसीबीने खुदाईचे कामही सुरू होते. अचानक मातीचा भराव संरक्षक भिंतीचे काम करणारे रियाज शिरणाळ आणि इस्माईल मुल्ला यांच्या अंगावर कोसळला. त्याखाली ते गाडे गेले. भराव बाजूला काढून त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, रियाज याचा ढिगाऱ्याखालीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी इस्माईल मुल्ला याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. धोकादायक पद्धतीने खोदकाम केल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेला विजेचा खांब दोन दिवसांपूर्वीच कोसळला होता. शेजारी राहणाऱ्या काही नागरिकांनी हे धोकादायक काम करताना सावध राहण्यास सांगितले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी रस्त्यालगत खोदकाम सुरूच ठेवले होते. रविवार सकाळपासून याठिकाणी खोदकाम सुरू होते. जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून त्याठिकाणी चिऱ्याची भिंत उभारुन इमारत व रस्ता सुरक्षित करण्याचा संबंधिताचा प्रयत्न होता. मात्र, याठिकाणी आरसीसी रिटेनिंग वॉल बांधण्याची विनंती नागरिकांनी केली होती. या कामाची तक्रार येथील नागरिक शेखर जोशी यांनी महसूलकडे दिल्याचेही सांगितले जात आहे.
या अपघातानंतर ही इमारत वादात सापडली आहे. रस्त्यालगत डोंगराचे खोदकाम करून होत असलेल्या धोकादायक कामामुळे येथील सुशीला अपार्टमेंटशेजारील रस्तासुद्धा धोकादायक बनल्याचे सांगितले जात आहे. कामगाराच्या मृत्यूनंतर याप्रकरणी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सागर पवार, सहायक उपनिरीक्षक प्रमोद झगडे करीत आहेत.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
संबंधित व्यावसायिकाच्या हलगर्जीपणामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला असून, याला जबाबदार असणाऱ्या ‘त्या’ व्यावसायिकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काही जागरुक नागरिकांनी केली आहे.