नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या सेवेकऱ्यांतर्फे चिपळुणात स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:29+5:302021-07-27T04:32:29+5:30
रत्नागिरी : चिपळूणमधील पूरपरिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. अजूनही अनेक संसार उघड्यावरच आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य ...
रत्नागिरी : चिपळूणमधील पूरपरिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. अजूनही अनेक संसार उघड्यावरच आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे रविवारीही अन्नाची पाकिटे व अत्यावश्यक गरजांची किट वाटण्यात आली. तसेच संस्थानच्या जिल्ह्यातील एक हजार सेवेकऱ्यांनी रविवारी चिपळुणात स्वच्छता माेहीम राबवली.
चिपळूण येथील पूरग्रस्त नागरिकांना आश्रय दिलेल्या जागी, शंकर नगरमध्ये घरोघरी जाऊन अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. अजून येथील घराघरात स्वयंपाक करावा, अशी परिस्थिती नाही. सर्वांचे अन्नधान्य भिजून खराब झाले आहे. त्यांना सहकार्य करणे गरजेचे होते. अजूनही अनेक लोक शाळेच्या इमारतीत आश्रयाला आहेत. त्यांना घरी जाता आलेले नाही. त्यामुळे संस्थानने येथे अन्नाची पाकिटे वाटपाचा उपक्रम राबविला. नागरिकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच संस्थानतर्फे प्राथमिक गरजांचे किट बनवून लोकांना देण्यात आले.
दरम्यान, शहरातील रस्तोरस्ती, घरांच्या परिसरात गाळ साठला आहे. प्रशासन व अनेक तरूण तो काढण्याचे काम करत आहेत. जिल्ह्यातील संस्थानचे एक हजार सेवेकरी येथील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले हाेते. संस्थानच्या रुग्णवाहिकाही येथील मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत. आजारी व्यक्तींना रुग्णालयात नेणे, अन्नाची पाकिटे वाहून नेणे, अन्य साहित्य नेणे आदी कामे या रूग्णवाहिका करत आहेत.
------------------------
चिपळूण येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या कार्यकर्त्यांतर्फे अन्नाची पाकिटे व अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.