कामथे उपजिल्हा रुग्णालयात साफसफाई मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:12+5:302021-05-13T04:32:12+5:30
चिपळूण : कोरोना रुग्णांसाठी आधार ठरलेल्या येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. बुधवारी सकाळपासून ...
चिपळूण : कोरोना रुग्णांसाठी आधार ठरलेल्या येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. बुधवारी सकाळपासून येथे नगरपरिषद कामगारांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत काही नागरिकांनीही सहभाग घेतला.
सध्या कोरोनाच्या परिस्थितीत कोविड केअर सेंटर म्हणून कामथे उपजिल्हा रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या रुग्णालयात एकूण १३२ बेड आहेत. यात ६५ ऑक्सिजन बेड तर ४ व्हेंटिलेटर बेड आहेत. या रुग्णालयात रुग्णांची संख्याही तितकीच आहे. चिपळूण तालुक्यासह उत्तर रत्नागिरीतील अनेक रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेले काही दिवस हे रुग्णालय हाऊसफुल्ल असून, एकही बेड रिकामा नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे या रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रमाणही तितकेच आहे.
त्यातून पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थाचे पॅकेट्स, कागद व अन्य वस्तूंमुळे येथे कचऱ्याची समस्या गंभीर बनली होती. सफाई कामगार वर्ग अपुरा असल्याने रुग्णालय वगळता परिसराची साफसफाई व्यवस्थित होत नव्हती. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात जागोजागी कचरा साचला होता.
याविषयी सामाजिक कार्यकर्ते तानू आंबेकर यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय सानप यांच्याशी संपर्क साधून साफ-सफाईची मागणी केली होती. तसेच या कामासाठी सफाई कामगार पुरवण्याविषयी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना विनंती केली होती. त्याशिवाय आंबेकर यांनी या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आरोग्य समिती सभापती शशिकांत मोदी यांनीही याप्रश्नी लक्ष घातले आणि सफाई कामगारांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सफाई कामगार शहराबाहेर कामासाठी पाठविण्यात आले होते.