मालगुंडमध्ये नववर्षानिमित्त राबवणार स्वच्छता उपक्रम
By admin | Published: December 30, 2014 09:48 PM2014-12-30T21:48:14+5:302014-12-30T23:24:18+5:30
श्री चंडिका कला पथक : राजे ग्रुपचा आगळावेगळा संकल्प
गणपतीपुळे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक काळातील शिवकालीन जयगड किल्ल्यावर दि. १ जानेवारी २०१५ या नववर्षाच्या निमित्ताने मालगुंड येथील श्री चंडिका जाखडी कला पथक व राजे ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहे.
नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातात. मात्र मालगुंड येथील श्री चंडिका जाखडी कला पथकाने आणि राजे ग्रुपने आगळा वेगळा संकल्प सोडला आहे. या ग्रुपने जयगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
या किल्ल्यावर यंदा प्रथमच ‘स्वच्छता मोहीम’ हा उपक्रम श्री चंडिका जाखडी - कलापथक व राजे ग्रुपतर्फे हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण जयगड किल्ला परिसरातील साफसफाई होण्यास मदत होणार आहे. शिवाय अनेक ठिकाणचे शिवकालीन किल्ले स्वच्छता उपक्रम राबवून किल्ल्याचे संवर्धन व डागडुजी करणेदेखील गरजेचे ठरणार आहे, अशी भावना या उपक्रमामधून इतर शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
२०१५ या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जयगड किल्ल्यावर स्वच्छता उपक्रम राबविण्याची संकल्पना मालगुंड येथील राजे ग्रुप व जाखडी पथकाने आखल्याने या उपक्रमात जयगड दशक्रोशीतील इतर शिवप्रेमींनीसुद्धा सहभागी व्हावे, असे आवाहन मालगुंड जोशीवाडी जाखडी कलापथकाचे प्रमुख संस्थापक बावा आग्रे यांनी केले आहे.
या दिवशी जाखडी कला पथक व राजे ग्रुपचे सर्व सदस्य उपक्रमात सहभागी होणार असून, एकदिवसीय कालावधीत संपूर्ण किल्ल्याचा परिसर साफसफाईने स्वच्छ करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे आपण कायमपाणे जयगड किल्ल्यावर प्रतिवर्षी अशा प्रकारचा उपक्रम सुरु ठेवणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)