स्वच्छता अभियान यापुढेही कायम
By admin | Published: November 17, 2014 09:12 PM2014-11-17T21:12:03+5:302014-11-17T23:25:17+5:30
विजयकुमार काळम-पाटील : दररोज मागवण्यात येतो स्वच्छतेचा अहवाल, दर महिन्याला ग्रामीण भागात पथक पाठवणार
जिल्ह्यात स्वच्छता अभियान यापुढे कायम सुरु ठेवण्यात येणार आहे़ त्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महिन्याला एकदा पथक पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले़ जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात सर्वच स्तरावर आघाडी घेतली आहे़ ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, अंगणवाड्या तसेच पंचायत समिती कार्यालये यामध्ये स्वच्छता मोहिमेला जोर आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जिल्हा परिषदेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले आहेत़ या स्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावचा आराखडा तयार केला आहे. त्या गावाला तयार करण्यात आलेल्या १६५ पथकांनी २ ते ३ वेळा भेटी देऊन तेथील स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याची सूचना देण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात काम सुरु आहे़ त्याबाबतचा अहवाल दररोज मागवण्यात येत असल्याचे मुख कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले़
अभियान सुरु करण्यापूर्वीचे फोटो, काम करतानाचे फोटो आणि त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतरचे फोटो घेण्यात यावेत, अशी सूचना प्रत्येक पथकाला देण्यात आली आहे. सर्व पथकांना दिवसासह वेळही ठरवून देण्यात आली आहे़ त्यामुळे कोणीही खोटा अहवाल देण्याचा प्रश्नच येत नाही़ त्यामध्येही कोणी खोटा अहवाल दिल्यास त्याची गय केली जाणार नाही़ त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले़
ते पुढे म्हणाले, सुरुवातीला वजनदार गठ्ठे उचलण्यात कर्मचारी महिलाही मागे राहिल्या नसून, त्या प्रामाणिकपणे काम करीत आहेत़ पहिल्या टप्प्यात कागदाचे गठ्ठे, त्यावरील धूळ, जाळ्या साफ करणे, अनावश्यक साहित्य, ट्रकभर बॅटऱ्या, मोडके पंप, २३ वर्षांपासूनचे पडून असलेले मशिनही परिषद भवनातून उचलण्यात आले आहेत़ दुसऱ्या टप्प्यात अनावश्यक असलेली ३० वर्षातील कागदपत्र, १० वर्षांची कागदपत्र आणि एक वर्षाची कागदपत्र वेगवेगळी करण्यात आली. अनावश्यक, कालबाह्य कागदपत्र व स्क्रॅब मोडीत काढून जिल्हा परिषद स्वच्छ करण्यात आली़ तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक विभागाचे वऱ्हांडे स्वच्छ केले आहेत़ तसेच प्रत्येक महिन्यात कृती करुन त्या-त्या विभागाने परिसर स्वच्छ ठेवण्यात येणार आहे़ त्यामुळे यापुढे ही स्वच्छता कायम राहणार असल्याचा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला़ अभियानाबद्दल कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन रात्री उशिरापर्यंत स्वच्छतेचे काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी राबवलेल्या या अभियानावर डाक्युमेंटरी फिल्म तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़
- रहिम दलाल