रत्नागिरीत स्वच्छतादूतांनी राबविले अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:51 PM2018-10-02T13:51:02+5:302018-10-02T13:54:57+5:30
महात्मा गांधी यांची १५० वी जयंती तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात मंगळवारी विविध गावे, सामाजिक संस्था तसेच कार्यालयांनी स्वच्छता मोहीम राबविली.
रत्नागिरी : महात्मा गांधी यांची १५० वी जयंती तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात मंगळवारी विविध गावे, सामाजिक संस्था तसेच कार्यालयांनी स्वच्छता मोहीम राबविली. त्यामुळे सर्वत्र आज स्वच्छतेचे दूत काम करताना दिसत होते.
गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहीम राबविली. तसेच आज ग्रामसभांचेही आयोजन करण्यात आले होते. विविध आध्यात्मिक संस्था, सामाजिक संस्था यांनी आज विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. सकाळी अगदी ६ वाजल्यापासून या मोहीमेला सुरूवात झाल्याने सर्वत्र स्वच्छता दूत हातात झाडू घेऊन काम करताना दिसत होते.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आलीे. या मोहिमेत स्वामी बाळ सत्यधारी महाराज सेवा मंडळाचे बाळ सत्यधारी महाराज आणि त्यांचे सेवाकरी तसेच आणि नेहरू युवा मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोहिमेत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष उदय सामंत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, सर्व नगरसेवक, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, रत्नागिरीचे प्रांत अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, महसूल विभागाच्या तहसीलदार वैशाली पाटील, रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, डॉ. दिलीप पाखरे, सुधाकर सावंत, प्रताप सावंतदेसाई तसेच या परिसरातील सर्व कार्यालयांंचे विभागप्रमुख व कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते.
आज शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या वतीने रूग्णालय परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच वन विभागाच्या रत्नागिरी परिक्षेत्रातर्फे नजिकच्या आरे वारे समुद्रकिनारी ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्येही विविध कार्यालये, गावांमध्येही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.