गडकिल्ल्यांची होणार स्वच्छता
By admin | Published: September 17, 2016 10:15 PM2016-09-17T22:15:25+5:302016-09-18T00:07:44+5:30
स्वच्छता अभियान : अभियानासाठी गड संवर्धन समितीची स्थापना
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला प्रतिसाद देत महाराष्ट्रात गड-किल्ले स्वच्छता अभियानाला प्रांरभ करण्यात आला आहे. हे स्वच्छता अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील विविध किल्ल्यांवर होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, आदी विभागांमधील १०० किल्ल्यांवर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात इतिहासाची साक्ष देणारे किल्ले आजही उभे आहेत. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, दापोली, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी याठिकाणी हे किल्ले अस्तित्वात आहेत. मात्र, यातील काही किल्ल्यांची अवस्था दयनीय असून, तेथे जाणेही कठीण बनले आहे. त्यामुळे हे किल्ले दुर्लक्षित राहिले आहेत. स्वच्छता मोहिमेमुळे दुर्लक्षित राहिलेल्या किल्ल्यांची स्वच्छता होऊन ते पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील. स्वच्छता अभियानामुळे जिल्ह्यातील दुर्लक्षित राहिलेल्या किल्ल्यांना ऊर्जितावस्था प्राप्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास असून, राज्यात साधारणत: ३५० किल्ले आहेत. सदर वारसा जतन करण्याचे काम राज्य शासनाचा पुरातत्त्व विभाग, क्रेंद्रीय पुरातत्त्व विभाग, गड-संवर्धन समिती तसेच गड-संवर्धन निगडीत स्वयंसेवी संस्था यांचा या स्वच्छता मोहिमेत सहभाग राहणार आहे. मुंबईतील शिवडी, सेंट जॉर्ज किल्ला, वरळी येथील किल्ल्यांवरील स्वच्छता मोहिमेला १७ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन योग्य पध्दतीने व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील इतिहास आणि गड-किल्ले तज्ज्ञ मंडळीचा समावेश असलेल्या गड-संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांना एक उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. त्याअंतर्गतचे ही गड-किल्ले स्वच्छता अभियान मोहीम राबविली जाणार आहे.
राम गणेश गडकरी यांनी ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे राज्याचे यथार्थ वर्णन केले आहे. या राज्याचा राकटपणा, कणखर आणि दणकट दगडांच्या वास्तू किल्ल्यांच्या रुपाने आजही टिकून आहेत. दुर्गवैभव हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि वारश्याचा गाभा आहे. किल्ल्यांची देखभाल करणे, त्यांचे जतन व संवर्धन करणे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
राज्यातील विविध भागात असलेल्या गड-किल्ल्यांच्या भागातील संबंधित पालकमंत्री, खासदार, आमदार, महानगरपालिका, नगरपालिका, गडप्रेमी संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, समाजसेवी संस्था यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन विनोद तावडे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत कचरा, प्लास्टिक स्वच्छता करण्यात येणार आहे. प्लास्टिकमुक्त गड-किल्ले असा या अभियानाचा गाभा आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या काळात किल्ल्यांच्या पायऱ्यांवर जमा झालेले शेवाळ काढण्यात येणार असून, या मोहिमेला सर्व गडप्रेमींनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन तावडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
पावसाचा अटकाव : पुन्हा मोहीम राबवणार
शासनाने हाती घेतलेल्या गड- किल्ल्यांच्या स्वच्छता अभियानात पावसाचा अडसर येण्याची चिन्हे आहेत. पावसामुळे गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमेला अडथळा आल्यास त्या गडांवरील स्वच्छता मोहीम पुढे घेण्यात येणार आहे. त्यामुळे पावसानंतर पुन्हा ही मोहीम राबविण्यात येणार आहे.