स्वामिनी बचत गटाचा स्वच्छता आदर्श
By admin | Published: December 2, 2014 10:48 PM2014-12-02T22:48:52+5:302014-12-02T23:32:46+5:30
व्यवसायासोबत स्वच्छताही : गाव विकासासाठी राबतानाच अभियानाद्वारे संदेश
गणपतीपुळे : कोळंबे गावातील टेंबवाडीमधील स्वामिनी महिला स्वयंसहाय्यता गटाने आपला व्यवसाय सांभाळून स्वच्छतेचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. उत्साहाच्या वातावरणात हे अभियान राबविले गेले.
गटातील सर्व महिला सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळी या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. ग्रामस्थांना प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच सहभागी होण्यासाठी ‘बघताय काय सामील व्हा’, ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ ‘स्वच्छता पाळा, रोगराई टाळा’ अशा स्वच्छता जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या.
तसेच हा स्वच्छता कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अर्चना अशोक भंडारी, किरण झित्रे गटाचे मार्गदर्शक अमित जोशी यांनी मार्गदर्शन केले.
अभियानाविषयी मनोगत व्यक्त करताना स्वामिनी महिला स्वयंसहाय्यता गटाच्या अध्यक्ष साक्षी जोशी यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. त्याचप्रमाणे गटाच्या सचिव वैदेही प्रदीप जोशी यांनी स्वच्छ पाणी व्यवस्थापन, तर गटाचे बुककिपर यांनी वैयक्तिक स्वच्छता, कुटुंबाची स्वच्छता, गटाच्या सदस्या दर्शना भितळे, संजना भोंबल, पूजा जोशी यांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सार्वजनिक मालमत्ता यांचे स्वच्छता करुन त्याची सुस्थितीत कशी राखता येईल, त्याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साक्षी जोशी, उपाध्यक्ष आरती जोशी, सचिव वैदेही जोशी, बुककिपर समृध्दी भितळे तसेच गटातील सदस्य पूजा जोशी, दर्शना भितळे, राजेश्री भोंबल, सुवर्णा जोशी, शुभांगी भोंबल, विजया जोशी, अक्षता अलीम, संजना भोंबल यांनी ़नियोजन केले . स्वामिनी बचतगटाने केलेल्या स्वच्छताविषयक कामगिरीने सर्वांपुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. असेच अभियान यापुढे सुरू ठेवणार असल्याचे गटातर्फे सांगण्यात आले. (वार्ताहर)