राजापूरच्या गंगातीर्थाचा मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 02:15 PM2020-04-16T14:15:00+5:302020-04-16T14:16:45+5:30
गंगातीर्थावर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी भाविकांना गंगेच्या स्नानाची पर्वणी साधता येणार नसल्याचे दिसत आहे.
राजापूर : ईश्वराचा साक्षात चमत्कार, विज्ञानाला मिळालेले आव्हान व मानवी बुध्दीला पडलेले कोडे असे सातत्याने वर्णन होत असलेल्या राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे १५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गंगातीर्थाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना गंगास्नानाचा आनंद घेता येणार नाही.
गतवर्षी २५ एप्रिलला गंगा अवतीर्ण झाली होती व त्यानंतर २४ जूनला ती अंतर्धान पावली होती. त्यावेळी तिचा कालखंड ६० दिवसांचा राहिला होता. निर्गमनानंतर नऊ महिन्यांनी गंगामाईचे आगमन झाले आहे. दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचे पाहावयास मिळत आहे.
यावेळीही ते दिसून आले. सकाळी स्थानिक गंगापूत्र व ग्रामस्थांकडुन गंगेच्या आगमनाचे वृत्त सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरले सोशल मीडियावरुन देखील गंगा आगमनाची बातमी पसरली. त्यामुळे भाविक मनोमनी सुखावला. मात्र, कोरोनाचे चालुन आलेले संकट व त्यापासून बचावासाठी उपाय योजना म्हणून सुरु असलेले लॉकडाऊन यामुळे घराबाहेर पडणे अशक्य असल्याने अनेकांना गंगास्नानाची पर्वणी साधता आली नाही.
दरवर्षी पावसाळा समाप्त होताच उष्ण वारे वाहू लागले की, गंगेच्या आगमनाची शंका येते यापुर्वी अनेक वेळा तो अंदाज खरा ठरला आहे मात्र यावर्षी लांबलेल्या पावसाळ्यानंतर तसे काहीच घडले नव्हते तरीही त्या प्रथेला छेद देत गंगामाई अवतरली आहे. मात्र, कोरोनामुळे गंगातीर्थाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. गंगातीर्थावर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी भाविकांना गंगेच्या स्नानाची पर्वणी साधता येणार नसल्याचे दिसत आहे.