कळंबस्तेतील रेल्वे फाटकामुळे तब्बल चार तास रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 02:03 PM2019-11-26T14:03:41+5:302019-11-26T14:06:32+5:30
यावेळी चिरणीमार्गे कळंबस्तेहून काही वाहने सोडण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठी या रस्त्याच्या रूंदीकरणाचे कामही सुरू आहे. मात्र, तसे झाल्यास कळंबस्ते रेल्वे फाटकाजवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर दिवसातून ६० फेऱ्या होत असल्याने तालुक्यातील कळंबस्ते येथील रेल्वे फाटक सुमारे चार तास बंद करावे लागते. पंधरागाव विभागातील ग्रामस्थांचा हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी ३६ कोटीचे तयार केलेले अंदाजपत्रकही धूळखात पडले आहे.
तालुक्यातील कळंबस्ते येथे मुख्य रस्त्यावर रेल्वे फाटक आहे. या मार्गावरून नवी कोळकेवाडी, मोरवणे, दळवटणे, निरबाडे, खांदाटपाली तसेच खेड तालुक्यातील काडवली, धामणंद, मुसाड, भिलसई, चोरवणे, चिरणी, आंबडस हा भाग पंधरागाव नावाने सर्वदूर परिचित आहे. हजारोंच्या संख्येने या गावांमध्ये लोकवस्ती असून, चिपळुणात ये-जा करण्यासाठी कळंबस्ते हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरील रहदारीचे प्रमाणही आता वाढले आहे. एखाद्या वेळी रेल्वे फाटक पडले असल्यास वाहनांची लांबच-लांब रांग लागते. त्यातच आता रेल्वे मार्गावर जादा व रो-रो स्वरूपाच्या गाड्यांचे प्रमाण वाढले असल्याने दिवसातून अनेकदा रेल्वे फाटक बंद करावे लागते. अशा वेळी रुग्ण असो अथवा अन्य कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास येथे ग्रामस्थांपुढे कोणताही पर्याय राहात नाही. त्यामुळे हा प्रश्न ग्रामस्थांसाठी डोकेदुखी झाला आहे.
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटात लवकरच काम सुरू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत महामार्गावरील अवजड वाहने परशुराम मार्गे सोडता येणे अशक्य होणार आहे. यावेळी चिरणीमार्गे कळंबस्तेहून काही वाहने सोडण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठी या रस्त्याच्या रूंदीकरणाचे कामही सुरू आहे. मात्र, तसे झाल्यास कळंबस्ते रेल्वे फाटकाजवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
- अनेक वर्ष पत्रव्यवहार
पंधरागावमधील ग्रामस्थांकडून याविषयीचा वेळोवेळी पत्रव्यहार करण्यात आला आहे. त्यानुसार येथे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय झाला आहे. या उड्डाणपुलासाठी ३६ कोटींचे अंदाजपत्रक तयार आहे. कोकण रेल्वे व राज्य शासन यांच्याकडून प्रत्येकी ५० टक्के उपलब्ध करण्यात येणार आहे. रेल्वेने या निधीची तूरतूद केली आहे. मात्र उर्वरित निधीचा प्रश्न कायम असल्याने प्रस्ताव बारगळला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल असल्याने त्याचा थेट फायदा कोकण रेल्वेला होणार आहे. त्यामुळे या पुलासाठी शंभर टक्के निधी कोकण रेल्वेनेच उभा करावा. तरच हा प्रश्ना सुटेल. तत्कालिन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी याबाबत चर्चा होऊन त्यांनी ते मान्यही केले होते. मात्र, पुढे कार्यवाही झाली नाही.
- शौकत मुकादम, कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती.