घरघंटी वाटपावरुन गोंधळ
By Admin | Published: February 10, 2015 10:49 PM2015-02-10T22:49:14+5:302015-02-10T23:50:14+5:30
चिपळूण पंचायत समिती : मासिक सभेत सदस्यांची खडाजंगी
अडरे : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मंजूर झालेल्या घरघंटी वाटपावरुन सभेच्या सुरुवातीलाच सदस्य आक्रमक झाले. या विषयावरुन गोंधळ उडाला. चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती समिक्षा बागवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती सुचिता सुवार, गटक्षवकास अधिकारी गणेश पिंपळे, अन्य विभागाचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते. सदस्य संतोष चव्हाण यांनी घरघंटीस पिकोफॉल मशीन वाटपाबाबत प्रश्न उपस्थित केला. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून गेल्यावर्षी २७ घरघंटीसाठी ३ लाख २६ हजार ३७६ निधी मंजूर झाला होता. मागील सभेत घरघंटी पिकोफॉल मशीन या समान वाटपावरुनही गोंधळ निर्माण झाला होता. त्यानुसार मागील सभेतील ठरावाप्रमाणे सदस्यांच्या शिफारशीनुसार लाभार्थींना घरघंटी देणे व नवीन अनुदानातून पिकोफॉल मशीनचे वाटप करणे, अशी मागणी संतोष चव्हाण, अभय सहस्त्रबुद्धे, नंदू शिर्के यांनी केली. नवीन अनुदानानुसार उर्वरित सदस्यांच्या शिफारशीनुसार लाभार्थींना पिकोफॉल मशीनचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
गुहागरहून चिपळूणकडे येणाऱ्या एस.टी. बस बायपास मार्गे येत नसल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याबद्दल जितेंद्र चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित करुन, या बस बाजारपेठमार्गेच नेण्यात याव्यात अशी मागणी केली.
अभय सहस्त्रबुद्धे यांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करुन, सध्या सुरु असलेल्या सेमी इंग्रजी वर्गाबाबत शासनाचे धोरण चुकीचे असल्याचे सांगितले. दिलीप मोरे यांनी गणेश खिंड ते कापरे रस्त्याची दुरवस्था झाली असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रलंबित कामे त्त्वरित सुरु करण्याची मागणी केली.
बायोगॅस प्रकल्पाबाबत ग्रामपंचायतींना ज्याप्रमाणे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते, त्याचप्रमाणे घरकुल योजनेबाबत ग्रामपंचायतींना उद्दिष्ट द्यावे. याबाबत ठराव करावा, अशी मागणी अभय सहस्त्रबुद्धे यांनी केली. आरोग्य, कृषी, पाणी पुरवठा, महावितरण, एस.टी. या विभागांवरही चर्चा झाली.
चिपळूण पंचायत समिती सभेत बायोगॅस प्रकल्प, एस.टी. विभाग, शिक्षण, आरोग्य या विषयावर जोरदार चर्चा करण्यात आली. सभेत सदस्यांनी विविध विषयावर चर्चा केली.