प्रकल्प समर्थकांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:19 PM2021-02-10T16:19:04+5:302021-02-10T16:21:31+5:30
nanar refinery project Ratnagiri- आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा आहे, असे म्हणून आपली बाजू मांडण्यासाठी काही लोकांना मुख्यमंत्र्यांची भेट हवी आहे. मात्र बराच प्रयत्न करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचेच रहिवासी असलेल्या लोकांना भेटणे टाळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे लोक या लोकांना दलाल म्हणून त्यांची हेटाळणी करत आहेत. त्यांना जोड्याने मारा, अशी खुलेआम भाषणेही करत आहेत.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा आहे, असे म्हणून आपली बाजू मांडण्यासाठी काही लोकांना मुख्यमंत्र्यांची भेट हवी आहे. मात्र बराच प्रयत्न करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचेच रहिवासी असलेल्या लोकांना भेटणे टाळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे लोक या लोकांना दलाल म्हणून त्यांची हेटाळणी करत आहेत. त्यांना जोड्याने मारा, अशी खुलेआम भाषणेही करत आहेत.
आम्हाला प्रकल्प हवाय, आम्हाला रोजगार हवाय असे म्हणणाऱ्या लोकांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही. आम्ही परग्रहावरून आलो आहेत का, असा प्रश्न आता प्रकल्पाचे समर्थन करणारे लोक विचारत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१९ साली शिवसेनेने भाजपवर दबाव आणून रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय पदरात पाडून घेतला. या निर्णयाच्या आधीपासूनच या भागात प्रकल्प हवा आहे, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती. निवडणुकीच्या प्रचाराआधी महाराष्ट्रभर फिरणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आम्हाला प्रकल्प हवा, असे फलकही झळकले होते.
जुलै २०१९ मध्ये रत्नागिरीत रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा मोर्चा काढला गेला. त्यानंतर प्रकल्प हवा आहे, असे म्हणणाऱ्यांना एकत्र करणे सुरू झाले आणि प्रकल्पासाठी प्रत्यक्ष संमत्तिपत्र घेण्याला सुरुवात झाली.
जे प्रस्तावित प्रकल्प परिसरातील स्थानिक ग्रामस्थच आहेत, अशा लोकांची साडेआठ हजार एकर जमिनीची संमत्तिपत्रे तयार आहेत. हीच बाब मुख्यमंत्र्यांना सांगायची आहे. आम्हाला नोकऱ्या हव्या आहेत आणि त्यासाठी हा प्रकल्प आम्हाला हवा आहे, असे सांगण्यासाठी या लोकांना मुख्यमंत्र्यांची भेट हवी आहे. त्यासाठी वारंवार प्रयत्न करून झाले आहेत. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने प्रयत्न केलेले नाहीत.
सुनील तटकरे यांची पुन्हा भेट
रिफायनरीचे समर्थन करणाऱ्यांना एकत्र आणणारी रत्नागिरीतील फार्ड संघटना आणि राजापुरातील समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रायगडमध्ये जाऊन खासदार सुनील तटकरे यांची पुन्हा भेट घेतली. त्यांच्या विनंतीला मान देऊनच रत्नागिरीतील उपोषण मागे घेण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदाार शरद पवार यांच्याशी भेट घालून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी ॲड. शशिकांत सुतार, ॲड. कावतकर, पंढरीनाथ आंबेरकर, केशव भट, टी. जी. शेट्ये, राकेश नलावडे यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांची उपोषणकर्त्यांकडे पाठच
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणारे पालकमंत्री अनिल परब जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेल्या रिफायनरी समर्थकांकडे पाठ फिरवूनच निघून गेले. मुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्राचे आहेत, ते कोणालाही भेटतील, असे विधान त्यांनी पत्रकारांसमोर केले असले तरी उपोषणकर्त्यांना भेटण्याचे सौजन्य मात्र त्यांनी दाखवले नाही आणि आपण पालक असलेल्या जिल्ह्यातील लोकांना मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्यात स्वारस्यही दाखवले नाही. त्यामुळे शिवसेनेला फक्त विरोधकांची बाजूच कळते, बाकीच्यांचा आवाज ऐकू येत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
प्रक्रिया अजून सुरूच
कोणीही पुढाकार घेत नाही म्हणून अखेर १३ जानेवारीला प्रकल्प समर्थन समन्वय समितीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे ई-मेलने पत्र पाठवून भेटीसाठी वेळ मागितली. १३ जानेवारीच्या या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अजून काहीही उत्तर आलेले नाही. याबाबत त्या कार्यालयात दूरध्वनीवरून चौकशी करणाऱ्यांना प्रक्रिया सुरू आहे एवढेच उत्तर दिले जात आहे.
अजून वेळ होत नाही
मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी म्हणून रिफायनरी समर्थकांनी २६ जानेवारीला रत्नागिरीत उपोषण केले गेले. मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांना या लोकांना भेटण्यासाठी वेळ मिळालेला नाही. मुख्यमंत्र्यांना आपल्याच राज्यातील लोकांना वेळ द्यावासा वाटत नाही, ही खंत असल्याचे मत व्यक्त होत आहे.