गणपतीपुळेतील बोट क्लबचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:34 AM2021-08-19T04:34:26+5:302021-08-19T04:34:26+5:30

रत्नागिरी : एमटीडीसीने जलद आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुधारित बुकिंग इंजिन तसेच राज्यातील पर्यटनस्थळांच्या तपशीलवार माहितीसह नवीन संकेतस्थळ ...

CM launches boat club at Ganpatipule | गणपतीपुळेतील बोट क्लबचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

गणपतीपुळेतील बोट क्लबचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

Next

रत्नागिरी : एमटीडीसीने जलद आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुधारित बुकिंग इंजिन तसेच राज्यातील पर्यटनस्थळांच्या तपशीलवार माहितीसह नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. त्याचबरोबर सिंहगड (जि. पुणे) येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासाचे नूतनीकरण करण्यात आले आहे तर गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) येथे बोट क्लब सुरु करण्यात येत असून, या तिन्ही उपक्रमांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी ‘वर्षा’ निवासस्थानी शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्य डॉ. अनिता मुदलीयार, ‘मेक माय ट्रीप’चे हरजित कुमार, ‘स्काय-हाय’चे रुद्रबंधू सोळंकी, हर्षिल कोरिआ आदी मान्यवर उपस्थित होते. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यावेळी ऑनलाईन उपस्थित होते.

महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून, हे जगभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटन विकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यटन दिनानिमित्त राज्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील घटकांबरोबर २ हजार ९०५ कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला असून, या सामंजस्य करारामुळे राज्यातील पर्यटनक्षेत्राला चालना मिळणार आहे, असे सांगितले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोकणामध्ये निसर्गाचा खजिना उपलब्ध आहे. गणपतीपुळे येथील बोट क्लब तसेच स्काय-हायसोबत करण्यात आलेल्या करारासारख्या उपक्रमांमुळे कोकणातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. साहसी पर्यटनासारखा नवीन उपक्रम कोकणात यशस्वी ठरेल, असा विश्वास यक्त केला.

महाराष्ट्रासारखी पर्यटन समृद्धी इतरत्र कुठेही नाही, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आपण कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याबाबत नेहमी बोलत असतो. पण कोकणाचा पर्यटनासह इतर सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियाने कोकणासारखे होण्याबाबत बोलले पाहिजे, अशा पद्धतीने कोकणाचा विकास करु, असे सांगितले.

प्रारंभी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांनी प्रास्ताविक करुन पर्यटन विभागाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तसेच एमटीडीसीमार्फत आज सुरु करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

...........

एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकिंग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकिंग सुविधा उपलब्ध होण्यासाठी मेक माय ट्रीप आणि गो आयबीबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरुन कोठूनही आरक्षित करता येणार आहेत.

.........

महाराष्ट्रात स्काय डायव्हिंग हा साहसी क्रीडा प्रकार सुरु करण्याच्या दृष्टीने स्काय-हायसोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यासोबतही सामंजस्य करार करण्यात आला.

Web Title: CM launches boat club at Ganpatipule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.