उधाणामुळे पंधरामाड-कांबळेवाडी येथील किनाऱ्याची धूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:07+5:302021-07-23T04:20:07+5:30
रत्नागिरी : मुसळधार पावसाने जिल्ह्यात सर्वत्र नद्यांना महापूर आलेले असतानाच समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने पंधरामाड-कांबळेवाडी किनाऱ्याची पुरती वाताहत ...
रत्नागिरी : मुसळधार पावसाने जिल्ह्यात सर्वत्र नद्यांना महापूर आलेले असतानाच समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने पंधरामाड-कांबळेवाडी किनाऱ्याची पुरती वाताहत झाली आहे. या भागातील जवळपास १५ फुटांपेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. त्यामुळे या पावसाळ्यातही मिऱ्यावासीयांमध्ये भीती कायम आहे.
उधाणाच्या लाटांमुळे कोकण किनारपट्टी भागात दाणादाण उडवून दिली आहे. पुढील काही दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यातच बुधवारी उधाणाचे तांडव किनारपट्टी भागात पाहावयास मिळाले. अनेक ठिकाणी उधाणाचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
या उधाणाचा सर्वाधिक फटका मिऱ्या किनारपट्टीला बसला आहे. पंधरामाड- कांबळेवाडी येथील किनारपट्टीवर समुद्राच्या अजस्र लाटा आदळून किनाऱ्याची वाळू समुद्रात वाहून गेली आहे. किनाऱ्यावर दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. किनाऱ्यालगतचा रस्ताही वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तत्काळ उपाययोजना न केल्यास येथील घरांना मोठा धोका होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे.