रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र नारळी पौर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 09:21 PM2019-08-14T21:21:23+5:302019-08-14T21:21:39+5:30
ढोल ताशाच्या गजरात श्रीफळ मिरवणूक मांडवी किनाऱ्यावर काढण्यात आली.
रत्नागिरी : मासेमारीला सुरूवात करण्यापूर्वी समस्त कोळीबांधव समुद्राची पूजा करतात. कोळीबांधवाचा आनंदाचा सण असलेला ‘नारळीपौर्णिमेचा’ सण जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सीमाशुल्क मंडळाचे सहाय्यक आयुक्त अलोककुमार श्रीवास्तव यांचे हस्ते समुद्राला श्रीफळ अर्पण करून पूजा करण्यात आली.
सायंकाळी मिरवणुकीने कोळीबांधवांनी समुद्रकिनाऱ्यावर जावून भक्तिभावाने समुद्राची पूजा केली. समुद्रावर रोजी रोटी अवलंबून असलेल्या समुद्राला नारळ अर्पण करून कोळीबांधवांनी सुरक्षिततेसाठी प्रार्थना देखील केली. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, नगरपालिका, सीमा शुल्क कार्यालय, मांडवी पर्यटन संस्था, श्री भैरी देवस्थान ट्र्स्ट, तसेच विविध संस्था, नागरिकांतर्फे समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर सायंकाळी गर्दी झाली होती.
ढोल ताशाच्या गजरात श्रीफळ मिरवणूक मांडवी किनाऱ्यावर काढण्यात आली. सीमाशुल्क कार्यालयाचे अधीक्षक विजय खानोलकर, दिनेश वायचळ, निरीक्षक राजेश लाड, राजेंद्र कांबळे , अल्लाउद्दीन सारंग उपस्थित होते. कोळी, मच्छिमार बांधवांचा हा महत्वपूर्ण सण असल्यामुळे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.