Video - मिनी महाबळेश्वर गारठले, पारा ४.५ अंशावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 01:03 PM2019-02-09T13:03:39+5:302019-02-09T16:01:17+5:30
कोकणातील मिनी महाबळेश्वर असलेल्या दापोलीत शनिवारी (9 फेब्रुवारी) सकाळी सगळ्यात नीचांकी म्हणजेच तब्बल ४.५ अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.
शिवाजी गोरे
दापोली - कोकणातील मिनी महाबळेश्वर असलेल्या दापोलीत शनिवारी (9 फेब्रुवारी) सकाळी सगळ्यात नीचांकी म्हणजेच तब्बल ४.५ अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर ही नोंद असून शनिवारी सकाळी 7 वा.36 मिनिटांनी झालेली ही नोंद आहे. तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा ही सर्वात नीचांकी तापमानाची ही नोंद झाली आहे.
दवबिंदू गोठवणारी थंडी दापोलीत पडत आहे. या तापमानाच्या नोंदीचे फोटोही काढून ठेवण्यात आले आहेत. दापोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसांपासून दापोलीत चांगलीच थंडी पडत आहे. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असलेला दापोली परिसर हा समुद्र सपाटीपासून तब्बल तीन हजार पाचशे फूट उंचीवर वसलेला आहे. समुद्र किनारा केवळ ८ ते १० कि. मी.अंतरावर आहे. हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनच दापोली शहराची निवड ब्रिटिशांनी कॅम्पसाठी केली होती. बदलते राहणीमान उभी राहणारी सिमेंटची जंगले यामध्येही दापोली आपली मिनि महाबळेश्वर ही बिरुदावली जोपासून आहे हे विशेष!
दापोलीचे तापमान १९९७ नंतर सर्वात कमी आलेले ही तापमानाची नोंद आहे. यापूर्वी २ जानेवारी १९९१ साली ३.४ अशी तापमानाची नोंद झाली होती. यापूर्वी ४ ,५ अंश अशी नोंद काहीवेळा झाली आहे. सध्या पडत असलेली थंडी काश्मीर मध्ये पडत असलेला बर्फ यामुळे पडत असल्याचे कृषी विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. विजय मोरे यांनी सांगितले. गेले महिनाभर ही थंडी पडत असून याचे एव्हरेज साधारण 11 ते 12 अंश इतके असल्याचे सांगितले.