थंड वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:38 AM2021-09-09T04:38:31+5:302021-09-09T04:38:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अस्थमा आजार अनुवांशिक किंवा विशिष्ट प्रकारच्या वस्तू किंवा वासामुळे होण्याची शक्यता असते. थंड वातावरणात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : अस्थमा आजार अनुवांशिक किंवा विशिष्ट प्रकारच्या वस्तू किंवा वासामुळे होण्याची शक्यता असते. थंड वातावरणात काही जणांमध्ये हा आजार बळावतो. अस्थमा आजार श्वासनलिका आणि फुफ्फुसांवर आघात करतो. त्यामुळे अशा रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
अस्थमा अनुवांशिकही असू शकतो. त्यामुळे काही जणांना थंड वातावरणात याचा अधिक त्रास होतो. रासायनिक पदार्थांच्या संपर्कात आल्याने किंवा धूर, धूळ, अगरबत्ती, अत्तर आदींच्या वासाची ॲलर्जी असल्यानेही काही जणांना अस्थमाचा त्रास होतो. त्यामुळे ॲलर्जी असल्यास कशाची आहे, याचे निदान करून त्या वस्तूंपासून दूर राहण्याने अस्थमाला दूर ठेवता येते.
...........
प्रतिकारशक्ती कमी
अस्थमा आजारात प्रतिकारशक्ती कमी होते. काही वेळा थंड वातावरण, थंड पाणी, पदार्थ यांचे सेवन, पशुपक्ष्यांच्या सहवासात राहताना त्यांची पिसे किंवा केस श्वासनलिकेत गेल्यासही अस्थमा सुरू होतो. अस्थमा श्वासनलिका आणि फुफ्फुसांना अधिक इजा करतो. त्यामुळे अस्थमा असलेल्यांना थंड पदार्थ किंवा थंड वातावरणात राहणे वर्ज्य करावे. अनुवांशिक असल्यास उपचार नियमित करावेत.
.....................
बालकांमध्ये अस्थमा
अस्थमा केवळ मोठ्यांनाच नाही तर बालकांनाही विविध प्रकारची ॲलर्जी असल्यास त्यांना अस्थमा त्रास देतो. त्यामुळे त्यांना कुठल्या वस्तूंची ॲलर्जी आहे, याचे निदान करून त्यांना त्यापासून दूर ठेवावे. थंड वातावरणात फ्रीजमधील पदार्थ, गार पाणी यापासूनही त्यांना दूर ठेवावे.
..............
ही घ्या काळजी...
अस्थमा अनुवांशिक किंवा ठरावीक पदार्थ, विशिष्ट वास यामुळेही होतो. बऱ्याचशा व्यक्तींना थंड वातावरणात अधिक काळ राहिल्यास किंवा थंड पदार्थ खाल्ल्यास त्रास होतो. त्यामुळे गारव्यात कोमट पाणी पिणे, थंड पदार्थ, वातावरण, प्रदूषण यापासून दूर राहावे.
...................
अनुवांशिक, विशिष्ट पदार्थ वा वासांमुळे अस्थमा आजार
अस्थमा हा काही वेळा अनुवांशिक असू शकतो. तर बरेचदा विशिष्ट पदार्थ यांच्या वासामुळे, धूर, धूळ, विशिष्ट वास, अगरबत्तीचा वास, प्रदूषण यामुळेही अस्थमा सुरू होतो. त्यामुळे अनुवांशिक असल्यास नियमित औषधे आणि ॲलर्जीक असेल तर त्या पदार्थापासून किंवा वासापासून दूर राहावे.
डाॅ. संजय लोटलीकर, हृदयरोगतज्ज्ञ, रत्नागिरी