घरे-गोठ्यांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:50+5:302021-07-21T04:21:50+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक भागांत घरे, गोठे, संरक्षक भिंतींची ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक भागांत घरे, गोठे, संरक्षक भिंतींची पडझड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तलाठ्यांमार्फत या घटनांचा पंचनामा करून नुकसानाचे अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहेत.
रस्ता खचला
गुहागर : तालुक्यातील वेलदूर येथील सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जलसुविधा योजनेतून सुमारे ५ लाख रुपये खर्चून रस्ता बांधण्यात आला आहे. मात्र तीन महिन्यांपूर्वीच तयार केलेला हा रस्ता अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. या रस्त्यावर मोठमोठे चर पडले आहेत.
विजेचा लपंडाव सुरू
रत्नागिरी : तालुक्यातील हरचेरी पंचक्रोशीतील १८ गावांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने व्यापारी, व्यावसायिक त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणीचे होत आहे. सध्या ऑनलाइन शिक्षण तसेच इतर व्यवहारही ऑनलाइन होत असल्याने विजेमुळे सातत्याने अडथळा येत आहे.
कोरोना अहवाल प्रलंबित
रत्नागिरी : कोरोना तपासणीनंतर मिळणारे अहवाल विलंबाने मिळत आहेत. त्यामुळे संभाव्य बाधित व्यक्ती अहवाल मिळेपर्यंत घरात न थांबता बाहेर फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना अहवाल वेळेत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
महा ई-सेवा केंद्र सुरू
गुहागर : गेल्या चार महिन्यांपासून तालुक्यातील महा ई-सेवा केंद्र आणि सेतू कार्यालय बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत होत्या. परंतु आता दहावीचे निकाल लागले आहेत. थोड्याच दिवसांत बारावीचेही निकाल लागणार आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील महा ई-सेवा केंद्र आणि सेतू कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष
लांजा : तालुक्यातील इसवली पाथरटवाडी रस्त्यापासून जावडे - कातळगाव हा जोडरस्ता चार किलोमीटर लांबीचा आहे. परंतु दोन्ही गावांना जोडणाऱ्या या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून बांधकाम विभागाकडून हा रस्ता जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. परंतु रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.
पेन्शनपासून वंचित
देवरूख : संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र ठरविण्यात आलेले संगमेश्वर तालुक्यातील सुमारे सात हजार लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासून शासनाच्या या निराधार योजनेच्या पेन्शनपासून वंचित आहेत. सध्या ही पेन्शन उशिरा मिळू लागल्याने लाभार्थ्यांच्या आर्थिक समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
रोपांचे वाटप
चिपळूण : विघ्नहर्ता ग्रुपच्या वतीने ग्रुपमधील सर्व सदस्यांना या आठवड्यात रोपांचे वाटप केले जाणार आहे. याची सुरुवात झाली असून प्रत्येक सदस्याने घराच्या परिसरात किंवा अन्य ठिकाणी एक झाड लावून ते जगवावे, असे आवाहन या ग्रुपकडून करण्यात आले आहे. यासोबतच या ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमही राबविले जात आहेत.
दीप्ती यादव यांना पुरस्कार
खेड : तालुक्यातील वाडीबीड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दीप्ती यादव यांना आंबवली प्रभाग स्तरात उदयोन्मुख शिक्षिका पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. शाळाबंद, शिक्षण चालू या मोहिमेंतर्गत शाळा व मुलांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष यादव यांनी गौरविले.
पथक रवाना
रत्नागिरी : नाचणे रोडवरील अवैध व्यवसायातील संशयित महिलेला पकडण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक नुकतेच पुण्याला रवाना झाले आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपीची ती महिला पत्नी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ती लवकरच पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.