काव्यसंग्रह प्रकाशित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:35+5:302021-07-14T04:36:35+5:30
दापोली : दापोलीतील युवा कवी जयंवत चव्हाण यांचा पहिला काव्यसंग्रह ‘जगण्याच्या कविता’ गुरूपौर्णिमेला प्रकाशित होणार आहे. कवी जयवंत चव्हाण ...
दापोली : दापोलीतील युवा कवी जयंवत चव्हाण यांचा पहिला काव्यसंग्रह ‘जगण्याच्या कविता’ गुरूपौर्णिमेला प्रकाशित होणार आहे. कवी जयवंत चव्हाण यांनी अनेक काव्यस्पर्धांमध्ये यश मिळवले असून, त्यांनी वर्तमानपत्र, मासिक, तसेच दिवाळी अंकांमध्येही लेखन केले आहे. त्यांच्या पहिल्यावहिल्या ‘जगण्याच्या कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शब्दगंधा प्रकाशन, औरंगाबाद यांच्यामार्फत २३ जुलैरोजी होणार आहे.
मत्स्य प्रकल्पांकडे कल
रत्नागिरी : सागरी मत्स्योत्पादनात दिवसेंदिवस घट होत असल्याने कोळंबीसह गाेड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाला चालना देण्यास सुरुवात झाली आहे. कोळंबी मत्स्यसंवर्धन प्रकल्पांकडे कल वाढू लागला असून, रत्नागिरी जिल्ह्यात ४० प्रकल्पांना परवानगी दिली आहे. यामधून वर्षाला शंभर टनाहून अधिक उत्नादन काढले जाते.
ठेकेदारच मिळेना
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी येणाऱ्या खर्चाचा पूर्ण निधी अद्यापपर्यंत नगर परिषदेकडे प्राप्त नाही. त्यामुळे या कामाची निविदा भरण्यासाठी कोणताही मोठा विकासक पुढे आला नसल्याचा अंदाज आहे. गेल्या २५ दिवसांत एकाही ठेकेदाराने निविदा भरलेली नाही .
रोपांचे वाटप
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची वाहनचालक संघटना, लोटे येथील एक्सेल इडस्ट्रीज आणि कृषी महाविद्यालयाचा विस्तार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग चक्रीवादळग्रस्त शेतकऱ्यांना नारळ, सुपारी, रोपांचे वाटप करण्यात आले. केळशीतील दहा शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच नारळ रोपे व पाच सुपारी रोपे पाटप करण्यात आली.
बेरोजगारीची समस्या दूर होईल
आरवली : कोकणचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे आता कोकणचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होऊन बेरोजगारीची समस्या कमी होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडी, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी व्यक्त केले आहे.
मुसळधार पाऊस
दापोली : दोन आठवडयांच्या विश्रांतीनंतर दापोली तालुक्यामध्ये रविवारी दुपारपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. भातलावणीच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
संस्थांचा पुढाकार
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोरोनाने पालक मृत झालेल्या विद्यार्थ्यांना देवरूखमधील सामाजिक संस्था, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ व नेक्स्ट जनरेशन फाऊंडेशन शिक्षणाकरिता मदत करणार आहेत, अशी माहिती या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली. पालकांचे निधन झाल्यामुळे अनाथ मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
शेतकरी सुखावला
साखरपा : गेले पंधरा दिवस दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारपासून पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी शिल्लक ठेवलेल्या भातलावणीच्या कामांना पुन्हा जोमाने सुरुवात केली आहे.