जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:14+5:302021-08-18T04:37:14+5:30
रत्नागिरी : कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात असणाऱ्या संपूर्ण आरोग्य सेवेचा जिल्हाधिकारी डॉक्टर बी. एन. पाटील ...
रत्नागिरी : कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात असणाऱ्या संपूर्ण आरोग्य सेवेचा जिल्हाधिकारी डॉक्टर बी. एन. पाटील यांनी साेमवारी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. त्यांनी येथील जिल्हा रुग्णालय तसेच नव्याने सुरू झालेल्या महिला रुग्णालयातील सर्व साधन सुविधांची पाहणी करून याबाबत संबंधितांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे होते.
जिल्ह्यातील कोविडबाबतची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर १५ ऑगस्टपासून निर्बंधांमुळे सवलतीचा निर्णय झालेला आहे, त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या पार्श्वभूमीवर नव्याने रुग्ण संख्या वाढीचा धोकादेखील आहे. त्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी यांनी दोन्ही रुग्णालयांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. उपलब्ध सुविधा, औषधांची उपलब्धता, व्हेंटिलेटर यंत्रणा तसेच ऑक्सिजन पुरवठा आदींबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. रुग्णालयात अत्यावश्यक असणारे मनुष्यबळ तसेच येणाऱ्या काळात कुठे व किती बेडची संख्या वाढवता येईल, याबाबतदेखील चर्चा केली.
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातही त्यांनी भेट दिली. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी रुग्णालयात असणाऱ्या सद्यस्थितीची पूर्ण माहिती दिली. या रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, ऑक्सिजन साठा व ऑक्सिजन पुरवण्याची पद्धती याबाबत जिल्हाधिकारी यांनी माहिती घेतली.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी पीएम केअर फंडातून प्राप्त व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची तक्रार केली होती, याबाबतची वस्तुस्थितीदेखील जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतली. रुग्णांवर करण्यात येणारी उपचार पद्धती तसेच आवश्यक असणारी औषधे यांची उपलब्धता याबाबत आढावा घेतला.
उद्यमनगर भागातील महिला रुग्णालय इमारत सध्या विशेष कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत आहे. या ठिकाणी बाल रुग्णांसाठी आयसीयूची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. रुग्णांना सेवा देताना घ्यावयाची काळजी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना यासंदर्भात सुरक्षित अंतर तसेच इतर अत्यावश्यक खबरदारी याबाबत यावेळी चर्चा झाली.
जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता दिल्यानंतर आता सर्व दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सोबतच विविध ठिकाणी वाहतुकीत वाढ होणार आहे. तथापि रुग्ण संख्येत वाढ होणार नाही, याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून अनेक बाबी आवश्यक आहेत. त्याच्या अनुषंगाने पाटील यांनी या रुग्णालयातील सर्व बाबींचा आढावा घेतला.