जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णांची केली विचारपूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:34 AM2021-04-23T04:34:47+5:302021-04-23T04:34:47+5:30
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शहरानजीकच्या कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवन येथील कोरोना केअर सेंटर, रा. भा. शिर्के ...
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शहरानजीकच्या कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवन येथील कोरोना केअर सेंटर, रा. भा. शिर्के प्रशाला येथील स्क्रिनिंग सेंटर, माळनाका व रेल्वे स्टेशन येथील तपासणी पथकाला गुरुवारी भेट दिली. सामाजिक न्याय भवन कोविड केअर सेंटरमधील रुग्णांशी थेट संपर्क साधून मिळणारे औषधोपचार व जेवण याविषयी संवाद साधला.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड याही उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय भवन कोविड केअर सेंटरमधील रुग्णांशी संवाद साधला. कोविड केअर सेंटरमध्ये देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, पुरेसा औषध साठा व शासनाच्या मार्गदर्शक प्रोटोकॉलनुसार देण्यात येणारे उपचार याविषयी डॉक्टर व स्टाफशी चर्चा करून मार्गदर्शन केले. तेथील डाॅक्टर, स्टाफ नर्स व वॉर्डबॉय यांच्या कामांबाबत जिल्हाधिकारी मिश्रा यांनी समाधान व्यक्त केले. डॉक्टर व स्टाफ नर्स खूप चांगले काम करत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. जाखड यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे रा. भा. शिर्के प्रशालेतील स्क्रिनिंग सेंटर व रेल्वे स्टेशन येथील तपासणी पथकाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कार्यरत असलेल्या कोविड योध्द्यांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले.
सामाजिक न्याय भवन येथील कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ६९ सक्रिय रुग्ण आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये योगाचे क्लासेस सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र गावडे उपस्थित होते.