कृषी महाविद्यालय, फणस संशोधन केंद्राच्या प्रस्तावांना लवकर मान्यता; उदय सामंत यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 01:51 PM2024-02-12T13:51:25+5:302024-02-12T13:51:41+5:30
कोकण कृषी विद्यापीठाला १ कोटी देणार
लांजा : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा झाली असून, कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रांचा प्रस्ताव लवकरच शासनाकडून मान्य करून दिले जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, दोन कम्युनिटी रेडिओ केंद्रांसाठी सिंधुरत्न योजनेमधून कोकण कृषी विद्यापीठाला १ कोटी दिले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.
गवाणे (ता. लांजा) येथे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी कुलगुरू डाॅ. संजय भावे, संचालक डाॅ. प्रमोद सावंत, डाॅ. प्रशांत बोडके, डाॅ. प्रकाश शिनगारे, तहसीलदार प्रमाेद कदम, नगराध्यक्ष मनोहर बाईत, सरपंच भीमराज कांबळे उपस्थित होते.
मंत्री सामंत पुढे म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्राच्या जमिनीचा उपयोग शेतकऱ्यांसाठीच झाला पाहिजे. आधुनिक युगात अत्याधुनिक सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या केंद्राचा उद्देश आहे. रेशीम उद्योगाबाबत लवकरच बैठक आयोजित केली जाईल. महिला, युवकांना या उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. यावेळी कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रासाठी ५० एकर जागा देण्याची जबाबदारी माझी आहे, असेही ते म्हणाले. कुलगुरू डॉ. भावे म्हणाले की, आजचा शेतकरी हा अभ्यासू असून, बांबू उद्याेगावर काम होणे आवश्यक आहे. १० हेक्टर जागा बांबूसाठी वापरली तर आयात करायची आवश्यकता भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक डॉ. प्रमाेद सावंत यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. आनंद हनमंते यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.
नावाप्रमाणे चांगले काम करा
कोकण कृषी विद्यापीठाने नावाप्रमाणे चांगले काम करावे. संशोधनात्मक काम करून शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचवावी. त्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना कर्जमुक्त बनवावे. कोकण कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. त्याच मायेने शेतकऱ्यांना लाभ मिळावेत, असेही मंत्री सामंत म्हणाले.
विद्यापीठाला ‘डाेस’
आपल्या विद्यापीठाचे नाव मोठे आहे. तुमच्याकडे आलेला विद्यार्थी चांगला शास्त्रज्ञ, शेतकरी बनू शकतो, असा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे. नाव चांगले आहे म्हणून नावासाठी विद्यार्थी येतात. प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला काहीच मिळत नाही म्हणून दुसऱ्या विद्यापीठाचे मार्ग स्वीकारतात असे हाेणार नाही याची काळजी घ्या, असे सामंत म्हणाले.
दापोली, लांजात रेडिओ कम्युनिटी सेंटर
सध्याच्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील आंबा, काजूसह भात, नाचणी, आदी विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या बदलत्या वातावरणाची माहिती शेतकऱ्यांना अगोदरच मिळावी या दृष्टीने रेडिओ कम्युनिटी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. लांजा आणि दापोली कृषी विद्यापीठात हे सेंटर सुरू करण्यात येणार आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.