राजापूर पंचायत समितीत अध्ययन निष्पत्ती पुस्तिकांचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 04:17 PM2019-06-17T16:17:55+5:302019-06-17T16:19:13+5:30
राजापूर येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अध्ययन निष्पत्ती पुस्तकांचे ढीग जाळून शासकीय निधीची जणू होळीच केली आहे.
राजापूर : येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अध्ययन निष्पत्ती पुस्तकांचे ढीग जाळून शासकीय निधीची जणू होळीच केली आहे.
शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांना, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना अध्ययन निष्पत्ती पुस्तिकांचे वितरण प्रत्येक पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून शासनाने केले होते. मात्र, राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी काहीच देणे घेणे नसल्याप्रमाणे वितरणासाठी आलेल्या या पुस्तिकांचे वाटप न करताच त्या जाळून टाकण्याचा पराक्रम केला आहे.
राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा कारभार हा वादग्रस्त ठरत आलेला असताना मागच्यास ठेच, पुढचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोणीही शहाणपणा घेताना दिसून येत नाही. शासन स्तरावरुन आलेल्या अध्ययन निष्पत्ती पुस्तिकांचे वाटप न केल्यामुळे त्या तशाच पडून राहिल्या होत्या.
या सर्व अध्ययन पुस्तिका पंचायत समितीच्या मागील बाजूस ढीगच्या ढीग जाळून टाकण्यात आल्या आहेत. यामुळे शासन दरबारी याचा हिशेबच मिळणार नाही व संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल काहीच देणे-घेणे नसल्याचे यातून पुढे आले आहे.