अंगारकीला गणपतीपुळ्यामध्ये या, पण समुद्रात प्रवेश नाही, जिल्हा प्रशासनाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 05:08 PM2021-11-22T17:08:44+5:302021-11-22T17:09:54+5:30
Ganpatipule News: श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिनांक २३ नोव्हेंबर रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला अनेक भाविक येण्याची शक्यता आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अजूनही कोरोना पूर्णपणे गेला नसल्याने प्रशासनाने काही निर्बंध नव्याने जारी केले आहेत.
रत्नागिरी : श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिनांक २३ नोव्हेंबर रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला अनेक भाविक येण्याची शक्यता आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अजूनही कोरोना पूर्णपणे गेला नसल्याने प्रशासनाने काही निर्बंध नव्याने जारी केले आहेत. त्यानुसार दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच्या समुद्राच्या पाण्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे खुली करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येतात.
श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आलेले भाविक दर्शनानंतर किंवा दर्शनाआधी श्री क्षेत्र गणपतीपुळे लगत असलेल्या समुद्रामध्ये / समुद्र किनारी आंघोळ किंवा पोहण्यासाठी जातात व अशा वेळी समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे यापूर्वी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोणीही पाण्यात बुडण्याचा प्रकार घडू नये तसेच कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार, नागरिकांची जीवितहानी होऊ नये, म्हणून श्री क्षेत्र गणपतीपुळे याठिकाणी दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कोणत्याही भाविकास श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच्या समुद्राच्या पाण्यात जाण्यास या आदेशाव्दारे मनाई करण्यात येत आहे.
याखेरीज स्टॉल्स लावण्यासाठीही लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे. तसे आदेश देण्यात आले आहेत