पुढच्या वर्षी लवकर ये....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:10+5:302021-09-27T04:34:10+5:30

तू आल्यापासून तुझी पूजा, नैवेद्य, जेवण वगैरे सगळं आम्ही तू आमच्या कुटुंबाचा एक लाडका घटक समजूनच करतो. तुझ्या आगमनाआधी ...

Come early next year ....! | पुढच्या वर्षी लवकर ये....!

पुढच्या वर्षी लवकर ये....!

googlenewsNext

तू आल्यापासून तुझी पूजा, नैवेद्य, जेवण वगैरे सगळं आम्ही तू आमच्या कुटुंबाचा एक लाडका घटक समजूनच करतो. तुझ्या आगमनाआधी आम्ही तुझ्या स्वागतासाठी किती जय्यत तयारी करतो. रात्ररात्र जागून घराची रंगरंगोटी, साफसफाई करतो; पण हे सगळं करताना ना कधी थकवा जाणवत, ना कधी कंटाळा येत. ही सगळी कामं आम्ही अगदी मनापासून करतो. तुझ्या आगमनानंतर आमच्या घरातलं संपूर्ण वातावरण प्रसन्न होऊन जातं. आम्ही दररोजचे ताणतणाव विसरून जातो. आता बाप्पा घरात आला आहे तर तो विघ्नहर्ता घरातली सगळी किल्मिषं, संकटं निश्चित दूर करूनच त्याच्या गावी परत जाणार या भरवशावर आम्ही अगदी बिनधास्त होतो. ही सारी तुझ्या आगमनाची किमया आहे. तुझी दररोजची सेवा करताना मनातले दुष्ट विचारही आपोआपच नष्ट होतात. नेहमी वार व दिवस बघून आहार ठरविणारे आम्ही या दहा दिवसांत शुद्ध शाकाहारी व सात्त्विक आहार आनंदाने घेतो. इतक्या दिवसांत मांसाहाराची आठवणही मनात येत नाही. पूर्वी आजोबा सांगायचे, शाकाहार हाच मानवाचा खरा आहार आहे. मानवाची शरीररचना व पचनसंस्थाही शाकाहारास अनुकूल अशीच आहे. मात्र, आज अभक्ष्य भक्षण केल्यामुळेच माणसाचं शरीर अनेक व्याधींनी पोखरलं आहे. आजोबांच्या त्या म्हणण्याची प्रचीती या दहा दिवसांत नक्कीच येते.

तुझ्या सेवेसाठी मोठमोठ्या बडेजावाची गरज पडत नाही. जेवढ्या आनंदात तू श्रीमंतांकडे येतोस, तेवढ्याच आनंदात तू गरिबाच्या घरी विराजमान होतोस. गरीबाघरच्या साध्यासुध्या नैवेद्यानेही तू तृप्त होतोस. खरे तर, बाप्पा तू केवळ देव नसून तू मानवी संस्कृतीचा धर्म आहेस. त्यामुळेच जगभरात सर्वत्र बाप्पाचं अस्तित्व दिसतं. बाप्पाची भक्तीही त्यामुळेच त्रिखंडांत केली जाते. मात्र, सध्याच्या घोर अंधकारमय जगाला प्रकाशाच्या वाटेवर आणण्यासाठी बाप्पा तुला काहीतरी खास करावं लागणार आहे. अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांमधून अवघ्या जगाची सुटका करण्यासाठी तुला पुन्हा एकदा हाती शस्त्र घ्यावे लागणार आहे. संपूर्ण जग आज विविध आजारांच्या महामारींचा सामना करीत आहे. त्यातच विविध नैसर्गिक आपदांनी सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अशा सर्व संकटांचा सामना करताना आज संपूर्ण मानवजात नामोहरम व केविलवाणी झाली आहे. सर्वच जागतिक विघ्नांपासून अखिल मानवजातीची सोडवणूक करण्यासाठी बाप्पा आज तुझ्या गावी निघून गेलास तरी पुढच्या वर्षी लवकर ये!

बाबू घाडीगावकर, जालगाव, दापोली

Web Title: Come early next year ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.