खड्ड्यातून बाहेर येऊन विकासाकडे बघा; उदय सामंत यांचा विरोधकांना टोला
By मनोज मुळ्ये | Published: October 6, 2023 02:29 PM2023-10-06T14:29:07+5:302023-10-06T14:29:32+5:30
रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे, हा मुद्दा २०१४ साली सर्वप्रथम आपल्यासमोर आला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत.
रत्नागिरी : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संस्कृत विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. देशातील पहिली आर्किटेक्चरची फर्म रत्नागिरीत होणार आहे. मुंबईनंतरचे राज्यातील पहिले शासकीय विधी महाविद्यालय येत्या दोन महिन्यात रत्नागिरीत होणार आहे. म्हणूनच आता विरोधकांनी खड्ड्यातून बाहेर येऊन या विकासाकडे पाहावे, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हाणला.
रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नुकतेच सुरू झाले आहे. येथील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि प्राध्यापकांचा सन्मान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते झाला.
रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे, हा मुद्दा २०१४ साली सर्वप्रथम आपल्यासमोर आला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत. गुवाहाटी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात प्रथम या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. त्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीसाठी हालचाली सुरू झाल्या. तेथेही केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमुळे सर्व परवानग्या अल्पवेळातच मिळाल्या आणि हे महाविद्यालय मार्गी लागले. हे राज्यातील पहिले वातानुकुलीत शासकीय महाविद्यालय ठरले आहे, असे मंत्री सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.
रत्नागिरीमध्ये अनेक विकास कामे होत आहेत. दीर्घकालीन उपयोग होईल, असे शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. मात्र विरोधकांना केवळ खड्डेच दिसत आहेत. त्यांनी या खड्ड्यांच्या बाहेर येऊन विचार करावा, असा टोला मंत्री सामंत यांनी हाणला. अर्थात खड्ड्यांवर पर्याय म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असून, लवकरच ते काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक
रत्नागिरीत शासकीय महाविद्यालय होण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप मोठे योगदान असल्याचे मंत्री सामंत यांनी आवर्जून सांगितले. केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्यात खूप वेळ जातो. मात्र शिंदे आणि फडणवीस या जोडीमुळे या सर्व प्रक्रिया अल्पकाळात पार पडल्या. त्यामुळेच हे महाविद्यालय सुरू होऊ शकल्याचे ते म्हणाले.
वाघनखे रत्नागिरीत येणार
लंडनहून आणलेली वाघनखे तीन वर्षे भारतात राहतील, असा करार आहे. तीन वर्षात ती कोठे कोठे ठेवली जातील, ते निश्चित करण्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील जगातील पहिले अभ्यासकेंद्र रत्नागिरीमध्ये होणार आहे. तेथे ही वाघनखे काही काळासाठी असावीत, अशी मागणी आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे आणि त्यांनी ती मंजूरही केली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.