पत्रकार कायद्यासाठीच्या लढ्यात प्रसंगी रस्त्यावर उतरू
By admin | Published: May 26, 2016 10:10 PM2016-05-26T22:10:48+5:302016-05-27T00:19:43+5:30
हिना गावित : नंदूरबार येथे मराठी पत्रकार परिषदेतर्फे उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांचे खुले अधिवेशन
चिपळूण : पत्रकारांच्या कायद्यासाठीच्या लढ्यात आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरु, असे आश्वासनही दिले. गावित यांनी पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शनच्या मागणीला पाठिंबा देत हे मुद्दे आपण लोकसभेत उपस्थित करु, असे आश्वासन खासदार हिना गावित यांनी दिले. मात्र, पत्रकारांनी टीआरपीच्या मागे न लागता सत्य तेच दाखवावे असा सल्लाही त्यांनी दिला. नंदूरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार परिषदेच्या उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांचे खुले अधिवेशनात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस. एम. देशमुख होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, अॅड. राजेंद्र रघुवंशी, खासदार हिना गावित, आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, सरचिटणीस यशवंत पवार, विभागीय सचिव मीना मुनोत (नाशिक), शरद पाबळे (पुणे) व हेमंत डोर्लिकर (नागपूर), आदी उपस्थित होते. पाटकर यांनी देशात कार्यकर्ते व पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याबाबत विस्ताराने माहिती दिली.
अॅड. रघुवंशी यांनी पत्रकारांसाठी असलेल्या कायद्याची माहिती दिली. एखाद्या सत्य बातमीने कुणाची बदनामी होत असेल तर तीही बदनामीच्या खटल्यास पूरक ठरु शकते, असे सांगितले. आमदार रघुवंशी, किरण नाईक यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्ष देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याचा आढावा घेत भविष्यातील योजनांची माहिती उपस्थितांना दिली. परिषद सकारात्मक, रचनात्मक पद्धतीने पत्रकारांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे सांगितले. राज्यातील तालुकाध्यक्ष, पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्षांचा मेळावा नांदेड येथे दि. ३ जुलै रोजी होणार असून, या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी यावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. परिषदेच्या इतिहासात तालुकाध्यक्षांचा मेळावा प्रथमच होत असल्याचे सांगितले.
भविष्यात प्रत्येक तालुका थेट परिषदेला जोडण्याचा प्रयत्न होणार असल्याने मराठी पत्रकार परिषदेने सुरु केलेली पत्रकार कल्याणाची चळवळ अधिक वर्धिष्णू होणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकार करत असलेले दुर्लक्ष व राज्यातील पत्रकारांची सुरु असलेली ससेहोलपट याबद्दल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रतिनिधींपैकी अनेकांनी मनोगत व्यक्त करतानाच आपल्या भावना, प्रश्न देशमुख यांच्यासमोर मांडले. परिषदेने काय करावे यासंबंधीच्या काही कल्पनाही त्यांनी यावेळी अध्यक्षांसमोर मांडल्या. पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले.
नंदूरबारसारख्या आदिवासी भागात असे अधिवेशन प्रथमच होत असल्याने या अधिवेशनाबद्दल उत्सुकता होती. अधिवेशनासाठी नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, नगर येथील पत्रकार उपस्थित होते. योगेंद्र दोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिवेशनासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)