दिलासा! कोरोना रुग्ण कमी होत आहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:47+5:302021-07-22T04:20:47+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक झाल्याने जिल्ह्याला ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक झाल्याने जिल्ह्याला चांगलाच दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात ६९४ रुग्णांनी दिवसभरात कोरोनावर मात केल्याने, एकूण ६४,५१५ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी केवळ १५६ बाधित रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६९,११५ झाली आहे. कोरोनाने ४ रुग्णांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १,९७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या असूनही बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही समाधानकारक बाब आहे. जिल्हाभरात ७,७१४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील आरटीपीसीआर चाचणीत ५७ आणि अँटिजन चाचणीत ९९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये मंडणगड, लांजा तालुक्यातील रुग्ण कमी झाले असून, अनुक्रमे १ आणि ३ रुग्ण सापडले आहेत. दापोली तालुक्यात १३, खेडमध्ये २०, चिपळूणात ३७, संगमेश्वरमध्ये १०, रत्नागिरीत ५६ आणि गुहागर, राजापुरात प्रत्येकी ९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात २७७ कोरोनाबाधित ऑक्सिजनवर आहेत.
जिल्ह्यात लक्षणे नसलेले १,९९६ रुग्ण तर लक्षणे असलेले ६४८ अशा एकूण २,६४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९३.३४ टक्के असून, मृत्यूदर २.८५ टक्के आहे. मृतांमध्ये गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ५० पेक्षा जास्त वयोगटातील १,६४६ जण आणि सहव्याधी असलेले ७३१ रुग्ण आहेत.