महापुरात उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या उभारणीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:38 AM2021-09-07T04:38:00+5:302021-09-07T04:38:00+5:30
चिपळूण : श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते शहरातील शंकरवाडी येथे पुरात संपूर्णपणे ...
चिपळूण : श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते शहरातील शंकरवाडी येथे पुरात संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यात आला. या पायाभरणी समारंभाला आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे उपस्थित हाेत्या.
महापुरात चिपळूणमध्ये व्यापारी आणि सर्वच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी हे स्वतः चिपळूणवासीयांच्या मदतीसाठी धावून आले व त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्यासोबतच अन्नधान्याचे वाटप स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र सेवेकऱ्यांनी केले होते. ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती कमवता नाही, अशा लोकांच्या झालेल्या घराच्या पडझडीबाबत स्वामीजींनी या कुटुंबांना छोटेखानी नवीन घरे बांधून देण्याचा संकल्प जाहीर केला. त्यादृष्टीने स्वामीजींनी काही दिवसांपूर्वी आपल्या सेवेकरींसोबत घरांची स्वतः पाहणी केली व घरबांधणीची मोहीम तत्काळ हाती घेतली. या उपक्रमाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला.
चिपळूण शहरातील गोवळकोट, पेठमाप, शंकरवाडी, वडार कॉलनी तसेच ग्रामीण भागातील दळवटणे, मुंडे येथील पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली घरे निकषात बसली आहेत. आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या एकूण १० घरांची उभारणी पहिल्या टप्प्यात होणार आहे. शंकरवाडी येथील सरस्वती शिर्के या गरीब महिलेच्या घरबांधणीचा पायाभरणी शुभारंभ स्वामींजीच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात करण्यात आला.
------------------------
अनेकांचा मदतीचा हात
या उपक्रमात आमदार भास्कर जाधव हे घरांच्या उभारणीसाठी लागणारी खडी, जांभा, वाळू उपलब्ध करून देणार आहेत. आमदार शेखर निकम दहा गाडी जांभा चिरा देणार आहेत, तर भगवान कोकरे ट्रॅक्टर, जेसीबी देणार आहेत. नियत फाऊंडेशनचे दत्ता पवार, अमोल कदम, अनुपमा कदम यांच्यावतीने संपूर्ण घरबांधणी कामात लागणारा दगड देण्यात येणार आहे. तसेच निवळी येथील परशुराम सुर्वे, गुलाब सुर्वे हे ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर जांभा दगड उपलब्ध करून देणार आहेत. मिलिंद आग्रे, दीपेश आग्रे हे फॅब्रिकेशन काम करून देणार आहेत.
--------------
मदतीसाठी आवाहन
वास्तुविशारद दिलीप देसाई यांच्या संकल्पनेतून या घरांची उभारणी होणार आहे. घरे बांधून देण्याच्या सिद्धगिरी मठाच्या या संकल्पात दानशूर व्यक्तींनी आणि लोटे, खेर्डी, खडपोली औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी आर्थिक सहकार्याचा किंवा बांधकामासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याची मदत करण्यासाठी गुरुकुल फाऊंडेशनकडे संपर्क करावा, असे आवाहन मठाच्यावतीने श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकारांशी बोलताना केले.