जंगलांचे व्यापारीकरण
By admin | Published: April 26, 2016 11:08 PM2016-04-26T23:08:45+5:302016-04-27T00:56:56+5:30
सुरेखा दळवी : शेतीतील उत्पन्नाचे रहस्य का सांगत नाहीत?
रत्नागिरी : धरणी माता, जलजीवन आणि वनदेवता या सर्वांचे आज व्यापारीकरण झाले आहे. परंतु शेतीतून करोडो रुपयांचे उत्पन्न कसे मिळते, हे स्वत:ला शेतकरी म्हणवणारे राज्यकर्ते शेतकऱ्यांना सांगत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येते, असे परखड मत ज्येष्ठ कार्यकर्त्या अॅड़ सुरेखा दळवी यांनी व्यक्त केले.
विकासाच्या नावाने विकल्या जाणाऱ्या जमिनी वाचवायच्या कशासाठी? याचे उत्तर शेतमालावरील प्रक्रिया प्रशिक्षण देणाऱ्या महिलेच्या गौरव समारंभात मिळाले, अशा शब्दात श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात आलेल्या गीतांजली जोशी यांच्याबद्दल ज्येष्ठ कार्यकर्त्या अॅड. सुरेखा दळवी यांनी गौरवोद्गार काढले.
सेवाभावी वृत्तीने समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेला श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. पाच हजार रुपये, साडी, गीताईची प्रत आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असते. शेतमालावरील प्रक्रियेच्या प्रशिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे निरपेक्ष कार्य करणाऱ्या दापोली येथील गीतांजली जोशी या पुरस्काराच्या नवव्या मानकरी ठरल्या. त्यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कृषी क्षेत्रातील प्रशिक्षणाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना केंद्र शासनाच्या पुरस्काराने यापूर्वी गौरवण्यात आले होते. हा पुरस्कार म्हणजे आईच्या मायेने ज्येष्ठांनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप आहे, अशा शब्दात जोशी यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त
केले.
आपले समाजसेवक वडील पांडुरंग शिंदे, आई सुलोचना आणि कृषी विद्यापीठाचे संशोधक पती डॉ. जी. डी. जोशी यांना त्यांनी आपल्या कार्याचे श्रेय दिले. प्रगतीच्या मागे धावण्यात प्रथम बळी जाणारी संवेदनशीलता जागी करणे, ही आजची खरी गरज आहे, असे प्रतिपादन हरिश्चंद्र गीते यांनी अध्यक्षीय समारोपात केले.
यमुनाबाई खेर ट्रस्टच्या व्यवस्था समितीचे सदस्य बाळकृष्ण शेलार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सत्कारमूर्तींचा परिचय समिती सदस्य प्रकाश बोरकर यांनी करुन दिला. प्रमुख पाहुण्या अॅड. सुरेखा दळवी यांचा परिचय करुन देण्याची जबाबदारी व्यवस्था समितीच्या कार्याध्यक्ष वैशाली कानिटकर यांनी पार पाडली.
सत्कारमूर्ती गीतांजली जोशी आणि त्यांचे पती डॉ. जी. डी. जोशी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत ट्रस्टच्या व्यवस्था समितीचे उपाध्यक्ष गजानन चाळके यांनी या दाम्पत्याच्या परस्पर सहकार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्था समितीच्या सदस्य जयश्री बर्वे यांनी केले. समिती सदस्य प्रभाकर पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातही लढा : बेसुमार जंगलतोड
वीटभट्टी कामगार, वेठबिगार यांच्यावरील अत्याचार आणि अन्याय यांच्याविरोधात लढा उभारणाऱ्या अॅड. सुरेखा दळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील बेसुमार जंगलतोडीविरूध्द आवाज उठवला होता. त्यांच्या या लढ्यानंतर रत्नागिरीत जिल्ह्यात होणाऱ्या बेसुमार जंगलतोडीला लगाम बसला होता. सुरेखा दळवी यांनी उभारलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्काराने गौरव
शेतमालावरील प्रक्रियेच्या क्षेत्रात अनेक वर्षे निरपेक्ष कार्य करणाऱ्या दापोलीतील गीतांजली जोशी यांना यमुनाबाई खेर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.