आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावत जाऊन शिक्षक समितीने जपली बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:36 AM2021-08-14T04:36:26+5:302021-08-14T04:36:26+5:30
दापाेली : पूर आणि दरडी कोसळून आलेल्या अस्मानी संकटाच्या काळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आपत्तीग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी धावून ...
दापाेली : पूर आणि दरडी कोसळून आलेल्या अस्मानी संकटाच्या काळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आपत्तीग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी धावून जात सामाजिक बांधिलकी जाेपासली आहे.
महाराष्ट्रातील आपल्या माणसांवर आलेल्या प्रत्येक संकटात मदतीसाठी धावून जाणे ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची अखंडित परंपरा राहिली आहे. सध्याच्या आपत्ती काळातही शिक्षक समितीच्या माध्यमातून दापोली तालुक्यातील शिक्षक एकत्र येत चिपळूण, खेड व महाड येथील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी एकवटल्याचे पाहायला मिळाले.
पूर आणि दरड कोसळून सामान्य लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही तासांत होत्याचे नव्हते झाले. त्यानंतर तातडीने दापाेलीतील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे पूरग्रस्त बांधवांना मदतीचे आवाहन करण्यात आले हाेते. तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र अवघ्या पाच-सहा तासांत लाखोंचा निधी जमवत चिपळूण येथे कपडे व अन्नधान्य स्वरूपात किटचे वितरण केले. या आपत्ती काळात दापोली तालुक्यातून परजिल्ह्यात बदली झालेले काही शिक्षकही जिल्ह्याशी आपले जुने ऋणानुबंध जपत शिक्षक समितीच्या माध्यमातून मदतकार्यात हिरिरीने सहभाग घेतला हाेता. चिपळूण येथे पहिल्या टप्प्यातील तातडीच्या मदतीनंतर दुसऱ्या टप्प्यात खेड तालुक्यातील पोसरे गाव तथा तिसऱ्या टप्प्यात महाड आणि तळीये गावात मदतकार्याचे नियोजन करत गरजूंपर्यंत साहित्य पाेहाेचविण्यात आले.
-------------------------
एक दिवसाचे वेतनही घ्या
पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करून एवढ्यावरच न थांबता राज्यातील सर्व शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करून पूरग्रस्त बांधवांना तातडीची आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन राज्य शाखेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगली येथे प्रत्यक्ष भेटून देण्यात आले आहे. या मदतकार्यात सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे शिक्षक समितीतर्फे कौतुक करण्यात आले.