चिपळूणमधील नागरिकांचा संचारबंदीतही वाढता ‘संचार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:33 AM2021-04-20T04:33:05+5:302021-04-20T04:33:05+5:30
चिपळूण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवसाय ...
चिपळूण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवसाय बंद आहेत. गेल्या दोन दिवसांपासून किराणा दुकान तसेच भाजीपाला व्यवसायही बंद होता; मात्र साेमवारी सकाळी शहरासह, खेर्डी येथील काही किराणा दुकान, बेकरी दुकाने उघडी राहिली. त्यामुळे लॉकडाऊन असतानाही रस्त्यावरील नागरिकांचा संचार वाढला होता.
दिवसेंदिवस बाधित रुग्ण वाढत असून त्यातच नागरिकांची वर्दळ वाढल्याने नियम पाळून घरी थांबणाऱ्या लोकांमधून संताप व्यक्त केला जात होता.
कोरोनाचा संसर्ग वाढतच राहिल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काही दुकाने व व्यवसायांना सूट देण्यात आली होती;मात्र किराणा दुकानांसह भाजीपाला व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी वाढू लागल्याने प्रशासनाने त्यावरही निर्बंध आणले. त्यानुसार शनिवारी व रविवारी सर्वत्र शांतता होती. रस्त्यावरील नागरिकांची वर्दळही कमी झाली होती; मात्र सोमवारी सकाळी १० ते १२ च्या सुमारास अनेक ठिकाणी किराणा तसेच बेकरीची दुकाने उघडी होती. दुकाने उघडल्याने तिथे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली हाेती. रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ पाहता लॉकडाऊन संपला की काय, असे चित्र निर्माण झाले होते.
दरम्यान, संबंधित ठिकाणी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस गेल्यानंतर उघडलेली दुकाने बंद करण्यात आली. किराणा माल, चिकन व मटण विक्रेत्यांना घरपाेच सेवा देण्याच्या सूचना पालिकेने तसेच प्रशासनाने दिल्या आहेत. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, कारवाईस भाग पाडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
फोटो आहे.