करुणा, ज्ञानलालसा हे समान धागे : रुद्राक्ष साक्रीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:16+5:302021-04-16T04:31:16+5:30
रत्नागिरी : सर्वसामान्यांप्रति असणारी करुणा आणि ज्ञानलालसा हे बौद्ध आणि आंबेडकर यांच्या जीवनामधील समान धागे आहेत, अशी माहिती डाॅ. ...
रत्नागिरी : सर्वसामान्यांप्रति असणारी करुणा आणि ज्ञानलालसा हे बौद्ध आणि आंबेडकर यांच्या जीवनामधील समान धागे आहेत, अशी माहिती डाॅ. रुद्राक्ष साक्रीकर यांनी दिली. रत्नागिरीतील गाेगटे - जाेगळेकर महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डाॅ. रुद्राक्ष साक्रीकर यांचे ‘भारतीय तत्त्वज्ञानातील बाैद्ध दर्शन’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयाेजित करण्यात आले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी वक्तृत्व स्पर्धा, विविध अभ्यासकांची व्याख्याने आयाेजित केली जातात. त्याअनुषंगाने हे व्याख्यान आयाेजित करण्यात आले हाेते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभागप्रमुख तुळशीदास रोकडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व आणि आजवर झालेली ज्ञानवर्धक व्याख्याने, विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारे उपक्रम या संदर्भात त्यांनी माहिती दिली.
या व्याख्यानात डॉ. रुद्राक्ष साक्रीकर यांनी बौद्ध धर्मीयांचा अनात्मवाद, क्षणिक वाद, दु:ख या विचारांचा उहापोह केला. अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डाॅ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञान उपासनेपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शाखांचे विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.