मिऱ्या - नागपूर महामार्गाचा मोबदला केवळ आठ गावांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 01:30 PM2020-11-12T13:30:34+5:302020-11-12T13:31:40+5:30
highway, road, land, ratnagirinews रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन गेलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांमधील २७ गावांपैकी आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यातील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील केवळ दोन गावांच्या मोबदल्याची रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित गावांचा मोबदला अद्याप रखडलेलाच आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन गेलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांमधील २७ गावांपैकी आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यातील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील केवळ दोन गावांच्या मोबदल्याची रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित गावांचा मोबदला अद्याप रखडलेलाच आहे.
रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी संगमेश्वर तालुक्यातील १३ गावांमधील एकूण १३,३६,८३७ चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्यातील १४ गावांमधील ६,५२,२२० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. रत्नागिरीतील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील दहा अशा एकूण १६ गावांतील जमीनमालकांच्या मोबदला निवाड्यांची एकूण रक्कम ३१४ कोटी १३ लाख २१ हजार इतकी आहे.
दोन्ही तालुक्यातील या निवाड्यांचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे २०१७ साली पाठविण्यात आला होता. मात्र, तब्बल तीन वर्षानंतर म्हणजेच, फेब्रुवारी २०२० मध्ये केवळ रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या निवाड्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रूपये प्राधिकरणाकडून येथील उपविभागीय कार्यालयाकडे फेब्रुवारी अखेर प्राप्त झाली. तसेच संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव आणि ओझरे या दोन गावांमधील खातेदारांसाठी ६ कोटी ६३ कोटी एवढ्या मोबदल्याची रक्कम मार्च महिन्यात आली आहे. त्याचे वाटप सुरू आहे.
मुळात तीन वर्षानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली असून, केवळ आठ गावांच्या निवाड्याचा निधी देण्यात आला आहे. उर्वरित १९ गावांना अजूनही मोबदल्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या भूधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. केवळ आठ गावांचा निधी तीन वर्षानंतर आला. उर्वरित गावांच्या मोबदला रकमेसाठी प्राधिकरण अजून किती काळ प्रतीक्षा करायला लावणार, अशी प्रतिक्रिया या खातेदारांकडून व्यक्त होत आहे.
रक्कम प्रशासनाकडे
आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा आणि पानवल या सहा गावांसाठी ६९ कोटी २० लाख ७२ हजार इतकी मोबदल्याची रक्कम शासनाकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील केवळ साखरपा आणि ओझरे या दोन गावांसाठी ६ कोटी ६३ लाख रुपये एवढीच रक्कम प्रशासनाला देण्यात आली आहे.
रत्नागिरी, संगमेश्वरातील जमिनी संपादित
संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, करंजारी, जंगलवाडी, दाभोळे, दाभोळे खुर्द, मेढेतर्फ देवळे, कोंडगाव, साखरपा, साखरपा खुर्द, दखिण, निनावे, ओझरे, मुर्शी या १३ गावांमधील तसेच रत्नागिरी तालुक्यातील झाडगाव, नाचणे, पडवेवाडी, मधलीवाडी, कुवारबाव, कारवांचीवाडी, खेडशी, पानवल, हातखंबा, बाजारपेठ, पाली, साठरे, खानू, नाणीज या १४ गावांमधील जमीन संपादित केली आहे.