राज्याची पोलीस भरती प्रक्रिया सांभाळतेय सक्षम महिला अधिकारी

By admin | Published: April 1, 2017 06:37 PM2017-04-01T18:37:55+5:302017-04-01T18:37:55+5:30

रत्नागिरीत सोमवारी महिलांची भरती; महाराष्ट्रात पहिलाच उपक्रम

The competent women officers are coordinating the recruitment process of the state | राज्याची पोलीस भरती प्रक्रिया सांभाळतेय सक्षम महिला अधिकारी

राज्याची पोलीस भरती प्रक्रिया सांभाळतेय सक्षम महिला अधिकारी

Next

शोभना कांबळे/ रत्नागिरी
आॅनलाईन लोकमत

रत्नागिरीत सध्या पोलीस भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेची जबाबदारी मुख्यालयाच्या महिला पोलीस उप अधीक्षक डॉ. शीतल जानवे -खराडे यांच्याकडे देण्यात आली असून जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सक्षमपणे ही जबाबदारी त्या सांभाळत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक प्रणाली वापरण्यात आल्याने ही भरती पुर्णत: पारदर्शक होत आहे.

रत्नागिरीत २२ मार्च ते ३ एप्रिल याकालावधीत पोलीस भरती सुरू आहे. एकूण ७७ पदांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील ८८१५ उमेदवार या भरतीसाठी आले आहेत. त्यात पुरूष उमेदवारांची संख्या ७७९७ इतकी तर महिला उमेदवार १०९८ आहेत. ही जबाबदारी पोलीस उप अधीक्षक डॉ. जानवे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

गतवर्षी भरतीवेळी डमी उमेदवार असल्याचे निदर्शनास आले होते. या गोष्टी टाळण्यासाठी तसेच भरतीत अधिकाधीक पारदर्शीपणा यावा, यासाठी भरती प्रक्रियेच्या ठिकाणी सात महत्वाच्या जागांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच २९ कॅमेऱ्यांद्वारे या प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उमेदवारांच्या येण्याजाण्यावरही लक्ष ठेवले जात आहे. ही प्रणाली युआयएडीआयशी संलग्न असल्याने उमेदवाराची माहितीही सहजच उपलब्ध होते. दरदिवशी ८०० उमेदवारांची चाचणी घेतली जात आहे. यासाठी शीतल जानवे स्वत: पहाटे ४ वाजता या भरतीप्रक्रियासाठी उपस्थित असतात. पहाटेच्या भरतीमुळे उमेदवारांच्या गुणवत्तेतही वाढ होते. सकाळी १०.३० पुर्वीच ही भरती संपते.

खरतर मार्च अखेरच्या धावपळीत ही भरती प्रक्रिया सुरू झाली. कार्यालयीन कामाचा खोळंबा न होऊ देता महत्वाची असलेल्या भरती प्रक्रियेचे नियोजन करणे शीतल जानवे यांच्यासाठी आव्हानच होते. या भरती प्रक्रियेसाठी २७१ कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. योग्य मनुष्यबळ वापरले जावे, यादृष्टीने जानवे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले असल्याने हे कर्मचारी दोन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आपल्या कर्तव्यासाठी हजर होतात.
गेले अकरा दिवस शहरात पोलीस भरती सुरू आहे. पोलीस उपअधिक्षक शीतल जानवे यांचा भरतीचा हा पहिलाच अनुभव असुनही भरती अतिशय शांततेत सुरू आहे. कुठेही गोंधळ नाही. महिला उमेदवारांना अतिशय मोकळेपणाने या भरतीत सहभागी होता यावे, यासाठी जानवे यांनी शेवटच्या दिवशी, ३ एप्रिल रोजी या १०९८ महिलांचीच भरती ठेवली आहे.

सेवाभावी संस्थांचे सहकार्य...

सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या मुलांना पाणी तसेच सरबत वाटपाचा उपक्रम जाणीव, लायन्स क्लब, रोटरी क्लब, हजवाणी फाऊंडेशन आदी संस्था करीत आहेत. काही वेळा तर उमेदवारांना बुटही पुरविले जात आहेत. यामुळे उमेदवारांनाही दिलासा मिळाला आहे.

संगणक कक्षात महिला आघाडी...

संगणक कक्षात उमेदवारांचे गुण भरले जातात. त्यामुळे अशा गोपनीय कामाच्या ठिकाणी पाचच व्यक्ती कार्यरत आहेत. या कक्षातही सीसीटीव्ही आहे. या कक्षाची जबाबदारीही महिला उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड यांच्याकडे आहे.

या भरतीकडे पोलीसीदृष्टीने न बघता त्यांच्यातील खेळाच्या कौशल्याचे योग्य मुल्यमापन व्हावे यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या क्रीडा अधिकारी रूपाली झेंडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

संगणक कक्षात या परिक्षेच्या अनुषंगाने नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअरही सिंधुदुर्गमधील समीधा राणे या विद्यार्थीनीने चार दिवस आणि रात्र मेहनत घेऊन तयार केले असून ती स्वत:च ते हाताळीत आहे. यात एकदा भरलेले गुण जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधिक्षक यांच्याशिवाय कुणालाही बदल करता येत नाही. तसेच एखादा उमेदवार भरतीसाठी पुढच्या वेळी आला तर त्याला आधीच्या भरतीमध्ये का अपात्र केले होते, एवढी इत्यंभूत माहितीही या सॉफ्टवेअरच्या आधारे कळणार आहे.

गेल्यावर्षीच्या भरतीवेळी डमी उमेदवार आढळला होता. त्यामुळे यावेळी ती खबरदारी घेतली आहेच. पण सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिक प्रणालीमुळे भरतीप्रक्रिया पुर्णत: पारदर्शक होईल, हा विश्वास आहे. भरती प्रक्रियेसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पुर्ण टीमच मेहनत घेत आहे.
डॉ. शीतल जानवे,

पोलीस उपअधीक्षक

Web Title: The competent women officers are coordinating the recruitment process of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.