कुटुंबाला वाळीत टाकल्याची तक्रार
By admin | Published: February 17, 2016 01:01 AM2016-02-17T01:01:28+5:302016-02-17T01:08:27+5:30
पोलिसांकडे मांडले गाऱ्हाणे : संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फ संगमेश्वर गावातील घटना
देवरूख : देवाच्या नावावर कोणतीही हत्या करू नका, भक्ष्य देऊ नका, असे सांगितले म्हणून गावाने आपल्या कुटुंबाला वाळीत टाकले, अशी तक्रार वाशीतर्फ संगमेश्वर गावातील ग्रामस्थ संतोष सदानंद बोल्ये यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या तक्रारवजा निवेदनात म्हटले आहे की, गावातील ग्रामस्थांना देवदेवस्कीच्या नावाखाली घाबरवून येथील ग्रामस्थाने आमच्या कुटुंबाला सहकार्य न करण्यास (वाळीत टाकण्यास) प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. वाशीतर्फ संगमेश्वर गावचे रहिवासी सन २०१५ पर्यंत कै. सदानंद बाबू बोल्ये यांच्या अधिपत्याखाली गावातील सण, उत्सव साजरे करत होते. रत्नकांत बोल्ये हे वाशी गावचे २००३पर्यंत गावकर म्हणून काम करीत होते. मात्र, ते अनधिकृत काम करीत असल्याचे लक्षात येताच गावाने बैठक बोलावली. या बैठकीतून ते कोणतेही कारण न देता निघून गेल्याने गावाने २००३ साली गावकीची जबाबदारी सदानंद बोल्ये यांच्याकडे दिली, असेही या निवेदनात म्हटले आहे. तेव्हापासून २०११ पर्यंत रत्नकांत हे गावाला कोणत्याच प्रकारचे सहकार्य करीत नव्हते. त्यावर्षी त्यांच्याकडे पालखी न नेण्याचा निर्णय गावाने घेतला. मात्र, या उत्सवात कोणतेही सहकार्य न करता त्यांनी गावाकडून पालखी ओढून नेण्याचा प्रकार केला. उत्सवात गावात तंटा नको म्हणून गावाने याची तक्रार केली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
सन २०१२मध्ये सदानंद बोल्ये यांनी याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावर त्यांना बोलावून पोलिसांनी समज दिली. मात्र, ते आपल्या हट्टावर कायम राहिल्याने त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. २०१४ साली पुन्हा तक्रार झाल्यावर संगमेश्वर पोलिसांनी त्यांना बोलावून घेत गावाला सहकार्य करण्याची तंबी दिली. ती मान्य झाल्याने गावाने त्यांना सामावून घेतले. यानंतर गावातील काही लोकांना हाताशी धरून त्यांनी देवदेवस्कीची भीती दाखवण्यास सुरुवात केल्याचे निवेदनात म्हटले आहे. २६ एप्रिल २०१४ रोजी गावात झालेल्या बैठकीत यापुढे देवाच्या नावावर कोणतीच हत्या करायची नाही व देवाला नैवेद्य म्हणून भक्ष्य द्यायचे नाही, असा ठराव झाला. सर्व गावाने तशी प्रतिज्ञाही केली.
मात्र, त्यांनी या गोष्टीला विरोध केला. यानंतर २१ जून २०१४ च्या बैठकीत त्यांनी मागील ठरावाला विरोध करून मी तीन महिन्यांत गावाची घडी बसवतो, असे सांगितले. गावानेही त्यांना मुदत दिली. मात्र, त्यांनी तसे न करता नवरात्र उत्सवात बाधा आणली. यावेळीही गावातील शांतता बिघडू नये म्हणून गावकरी शांत राहिले. यानंतर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकर पदावरून गोंधळ घातला. ही सभा पुन्हा घेण्यात आली. २०१५ मध्ये गावातील शांतता बिघडल्याने पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली शिंंपणे उत्सव रद्द करण्यात आला. यावेळी बैठक झाली, पण तोडगा पडला नाही.
त्याचवर्षी सदानंद बोल्ये यांचे निधन झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी आपणाकडे त्यांचा मुलगा म्हणून गावाचा खजिना मागितला, तो आपण गावाकडे सुपूर्द केला. मात्र, आम्ही केलेल्या हत्याविरोधी ठरावाला विरोध करीत काही ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्हाला वाळीत टाकण्याचे काम केल्याचे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
अराजकता : ग्रामस्थांमध्ये फूट पडली
देवदेवस्कीच्या नावावर गावात अराजकता माजवली जात आहे. यातून ग्रामस्थांमध्ये फूट पडली आहे. याबाबत योग्य ती चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, देवरूख तहसीलदार यांच्याकडेही सादर करण्यात आले आहे.