माध्यमिक शिक्षक पतपेढीबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:27+5:302021-03-25T04:29:27+5:30
टेंभ्ये : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या वार्षिक सभेमध्ये केवळ मर्जीतील लोकांनाच बोलण्याची संधी दिल्याची तक्रार रत्नागिरी ...
टेंभ्ये :
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या वार्षिक सभेमध्ये केवळ मर्जीतील लोकांनाच बोलण्याची संधी दिल्याची तक्रार रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांच्याकडे केली असल्याचे अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची चौतीसावी वार्षिक अधिमंडळ सभा शनिवार दिनांक २० रोजी झाली. या सभेबाबत पतपेढीच्या बहुतांशी सभासदांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे सागर पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
ही सभा सुरुवातीला रविवार दि. २१ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ही तारीख बदलून शनिवारी दुपारी २ वाजता घेण्याचे ठरवण्यात आले. पुन्हा सभेची वेळ बदलून ही सभा सायंकाळी ४ वाजता सुरू होईल, असे निश्चित करण्यात आले. प्रत्यक्षात सभा सायंकाळी ४.३० वाजता सुरू झाली. या सर्व प्रकारामुळे अनेक सभासदांना या सभेपासून वंचित राहावे लागले.
सभेला उपस्थित असणाऱ्या व केवळ आपल्या मर्जीतील सभासदांनाच संचालक मंडळाने बोलण्याची संधी दिल्यामुळे सर्व निर्णय एकतर्फी घेण्यात आले. आर्थिक वर्षामध्ये संचालक मंडळाने केलेल्या खर्चावर कोणत्याही प्रकारे चर्चा करण्यात आली नाही. यासंदर्भात सभेपूर्वी लेखी स्वरुपात विचारण्यात आलेल्या प्रश्नांचीही अत्यंत तुटपुंजी अशी उत्तरे देण्यात आली. चौतीसाव्या अहवाल वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक उधळपट्टी होऊनही यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा खुलासा संचालक मंडळाने दिला नाही. या सभेच्या विषय पत्रिकेवरील सभासद सहाय्यता निधी व प्रधान कार्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीसंदर्भातील विषयावर सभासदांची भूमिका विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेण्यात आले असल्याचे सागर पाटील यांनी स्पष्ट केले.
माइक म्यूट केला
या वार्षिक अधिमंडळ सभेमध्ये सभेच्या सुरूवातीपासूनच संचालक मंडळाने आपल्या मर्जीतील सभासदांना बोलण्याची संधी दिली. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष व पतपेढीचे सभासद सागर पाटील हे सभेच्या सुरुवातीपासून आपल्याला मत मांडण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. परंतु त्यांना कोणत्याही विषयावर बोलण्याची संधी देण्यात आली नाही. विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्यानंतर पाटील यांना बोलण्याची संधी दिली. परंतु एक मिनिटामध्येच त्यांचा माइक म्यूट करण्यात आला.