कळंबणी बुद्रुक येथील झाड चाेरीप्रकरणी तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:22 AM2021-06-20T04:22:07+5:302021-06-20T04:22:07+5:30
खेड : तालुक्यातील कळंबणी बुद्रुक येथील मंदा गंगाराम फावरे यांच्या मालकीच्या जागेतून तब्बल ३० लाख रुपये किमतीची साग, आंबा, ...
खेड : तालुक्यातील कळंबणी बुद्रुक येथील मंदा गंगाराम फावरे यांच्या मालकीच्या जागेतून तब्बल ३० लाख रुपये किमतीची साग, आंबा, आईन, फणस आणि इतर झाडे चोरून नेल्याप्रकरणी गुरुवारी खेड पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे.
लॉकडाऊन कालावधीत काही लाकूड माफियांनी जमीन मालकाची कसलीही परवानगी न घेता त्यांच्या वडिलोपार्जित क्षेत्रात घुसून लाखो रुपयांच्या झाडांची कत्तल करून ती चोरून नेल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली आहे.
खेड तालुक्यातील कळंबणी गावात असलेल्या मंदा फावरे यांनी वडिलोपार्जित सर्व्हे क्रमांक ६२/१४, २/४, ५०/६, ७/१० तसेच ४८/२३, २४, २५ व २८ या जमिनीत असलेली सुमारे ४० ते ५० वर्षे वयोगटातील मौल्यवान व किमती झाडे तोडून व चोरी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, मंदा फवारे यांनी दीड महिन्यांपूर्वी खेडमधील तत्कालीन वन अधिकारी अनिल दळवी यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली होती. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. नंतर लॉकडाऊनचा कालावधी आणि तौक्ते चक्रीवादळामुळे तक्रारदार यांना याबाबतचा पाठपुरावा करण्यास विलंब झाला.
मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी कारवाईबाबत विचारले असता कोरोनामध्ये अनेक लोक मेले असून त्यांना जाळण्यासाठी लाकडांची गरज आहे. असे कारण वनविभागाच्या कर्मचाऱ्याने दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता पोलीस स्थानकात थेट तक्रार दिली असून, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी लाकूडमाफियांवर व हलगर्जी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे़