रत्नागिरीतील जिल्हा प्रशासनाच्या मदत कक्षाकडे तक्रारींचा ओघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:27 PM2018-03-23T13:27:26+5:302018-03-23T13:27:26+5:30
रत्नागिरी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी जनतेच्या समस्या तसेच तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू केलेल्या २४ तास अद्ययावत मदत कक्षातून नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जात असल्याने या सेवेकडे नागरिकांचा ओघ वाढला आहे. गेल्या दहा महिन्यात या कक्षाकडे आलेल्या ३२५ तक्रारींपैकी ३१६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, केवळ ९ तक्रारीच प्रलंबित आहेत. यातही महिन्यापेक्षा जास्त कालावधीची केवळ एकच तक्रार आहे.
रत्नागिरी : जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी जनतेच्या समस्या तसेच तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू केलेल्या २४ तास अद्ययावत मदत कक्षातून नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जात असल्याने या सेवेकडे नागरिकांचा ओघ वाढला आहे. गेल्या दहा महिन्यात या कक्षाकडे आलेल्या ३२५ तक्रारींपैकी ३१६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, केवळ ९ तक्रारीच प्रलंबित आहेत. यातही महिन्यापेक्षा जास्त कालावधीची केवळ एकच तक्रार आहे.
जनतेच्या समस्यांचा निपटारा तातडीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या प्रशासकीय इमारतीत दुसऱ्या मजल्यावर २४ तास कार्यरत असलेल्या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. २५ मे २०१७ रोजी या मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्ह्यातील नागरिक कुठल्याहीवेळी आपल्या शासकीय कामकाजाबाबतच्या समस्या वा तक्रारी या ह्यहेल्पलाईनह्णकडे नोंदवू शकतात. जिल्हाधिकारी प्रदीप पी. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मदत कक्षात नागरिकांच्या समस्यांची तसेच तक्रारींची तातडीने दखल घेतली जात असल्याने आता या कक्षाकडे नागरिक मोठ्या विश्वासाने दाद मागू लागले आहेत.
हा कक्ष सुरू झाल्यापासून म्हणजेच २५ मे २०१७ ते २२ मार्च २०१८ या कालावधीत कक्षाकडे ३२५ तक्रारी दाखल झाल्या. मात्र, त्यांचा पाठपुरावा संबंधित विभागाकडे वेगाने करण्यात आल्याने यापैकी ३१६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तर ९ तक्रारी प्रलंबित आहेत. यात सात दिवसांतील ६, ७ ते १५ दिवस या कालावधीतील २ आणि महिन्यावरील एका तक्रारीचा समावेश आहे. या मदत कक्षामुळे सामान्य नागरिकांच्या समस्यांची तड लागत आहे. नागरिकांनी निर्भयपणे या मदत कक्षाकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी केले आहे.
स्वतंत्र टोल फ्री क्रमांक
जिल्हा प्रशासनाने चौवीस तास सुरू केलेल्या मदत कक्षाकडे २२२२३३ या क्रमांकावर किंवा मदत कक्षाच्या स्वतंत्र टोल फ्री क्रमांकावर (१५५३९९) सामान्य नागरिकाला कुठलीही शासकीय कार्यालये किंवा कुठल्याही नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांच्या कारभाराबाबत तक्रार करता येते. ही तक्रार लगेचच म्हणजे सात दिवसात सोडवली जाईल, असा कटाक्ष जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांचा असल्याने त्यांचा लागलीच निपटारा केला जात आहे.
तक्रारींचा निपटारा द्रुतगतीने
या तक्रारींमध्ये सर्वाधिक संख्या महसूल विभागासंदर्भात असून, त्याखालोखाल जिल्हा परिषदेबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने तक्रारी प्रलंबित ठेवणाऱ्या ९ खातेप्रमुखांवर वेतन रोखण्याची कारवाई केल्याने तक्रारींचा निपटारा द्रुतगतीने होऊ लागला आहे.
अलर्ट सिस्टीम
यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. कॉलसेंटरवर आलेली तक्रार लगेचच संबंधित विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत त्या विभागाकडे पाठविण्यात येते. यासाठी ह्यअलर्ट सिस्टीमह्ण आहे. त्यायोगे तक्रार करणाऱ्याला लगेचच आपली तक्रार संबंधित विभागाकडे गेल्याचे तसेच संबंधित विभागालाही त्याच्याकडे तक्रार पोहोचल्याचे कळविण्यात येते. या सॉफ्टवेअरद्वारे तक्रारींचे किती दिवसात निराकरण झाले, याची माहितीही संकेतस्थळावरून आता घरबसल्या मिळत आहे.