अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्यासमोर प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:27 PM2020-02-13T13:27:49+5:302020-02-13T13:29:22+5:30
घाडगेवाडी व काळंबेवाडी साठी एकच विहीर असून, एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. दोन्ही गावठाणांना पुरेल इतका पाणीसाठा त्या विहिरीत शिल्लक राहत नाही. त्यामुळे काळंबेवाडी पुनर्वसन गावठाची नळपाणी पुरवठा योजना करताना काळंबेवाडी साठी स्वतंत्र नवीन विहीर तयार करावी.
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधांची कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पबाधीत राजिवली काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील भूखंड ताब्यात देऊन त्या ठिकाणी नागरी सुविधा कामे पूर्ण करण्याच्या संदर्भात राजिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष येडगे यांनी शिष्टमंडळासह अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांची भेट घेऊन काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणाची पाहणी करुन प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक घेण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे बाबासाहेब बेलदार यांनी राजिवली काळंबेवाडी पुनर्वसन गावठाण पाहणी दौरा करुन पाटबंधारे विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तर एप्रिल अखेरपर्यंत गावठाण अंतर्गत वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते आदी कामे पूर्ण करुन एप्रिलमध्ये भूखंड ताब्यात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पुर्वी या कामांचा आढावा घेण्यासाठी मार्च महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे बाबासाहेब बेलदार यावेळी म्हणाले.
राजिवली काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहिलेल्या अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्यासमोर प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यामध्ये घाडगेवाडी व काळंबेवाडी साठी एकच विहीर असून, एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. दोन्ही गावठाणांना पुरेल इतका पाणीसाठा त्या विहिरीत शिल्लक राहत नाही. त्यामुळे काळंबेवाडी पुनर्वसन गावठाची नळपाणी पुरवठा योजना करताना काळंबेवाडी साठी स्वतंत्र नवीन विहीर तयार करावी.
तसेच वादळी वारे, अतिवृष्टी आदी नैसर्गिक कारणांमुळे गडनदी क्षेत्रातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो. त्याला पर्याय म्हणून गावठाणात सार्वजनिक एक उघडी विहीर बांधून द्यावी. पाण्यासोबतच विजेची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून आलेले अंदापत्रक मंजूर नकाशाप्रमाणे आहे का ते पहावे, काही बदल आवश्यक असल्यास ते तातडीने करुन अंमलबजावणी करावी आणि एप्रिल अखेरपर्यंत वीजपुरवठा सुरु करावा अशा सूचना यावेळी बेलदार यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या.