नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:33 AM2021-07-30T04:33:37+5:302021-07-30T04:33:37+5:30

चिपळूण : परिसरात महापूर आल्यानंतर झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर केली जाईल. ...

Complete the damage panchnama immediately | नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

Next

चिपळूण : परिसरात महापूर आल्यानंतर झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर केली जाईल. पंचनामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना दिली.

चिपळूणमध्ये २२ जुलैला महापूर आला होता. त्याची पाहणी करण्यासाठी पर्यटनमंत्री ठाकरे गुरुवारी चिपळूणच्या दौऱ्यावर होते. त्यांनी खेर्डी, काविळतळीसह शहराच्या काही भागात जाऊन नुकसानाची पाहणी केली. ज्या भागात ते पाहणीसाठी गेले, तेथे पाणी किती फूट भरले होते, लोकांचे काय काय नुकसान झाले, जीवित हानी झाली का, शेतीचे किती नुकसान झाले, याची माहिती ते अधिकाऱ्यांकडून घेत होते.

पाहणी दौरा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळुणातील पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कोणालाही मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. प्रत्येकाला मदत मिळेल असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. परंतु मदतीचा अंदाज येण्यासाठी पंचनामे पूर्ण होणे गरजेचे आहे. ते झाल्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल. पूर ओसरल्यानंतर आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. चिपळूणमध्येही रोगराईचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्यावे.

विरोधी पक्षाकडून होणाऱ्या आरोपाबाबत त्यांना विचारले असता मंत्री ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण ही वेळ टीका करण्याची नाही. एकमेकांना मदत करून पुन्हा एकदा चिपळूण उभे करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकार आणि माझे लक्ष त्याकडे आहे. यावेळी आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

...............

ताफा अडवण्याचा प्रयत्न

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे काविळतळी भागात आल्यानंतर तेथील काही लोकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मंत्री, आमदार, खासदार चिपळूणला नुसते दौरे करत आहेत. मदत कोणीही करत नाही, अशी विचारणा त्यांना करण्यात आली. यावेळी गोंधळ उडाला. मंत्री ठाकरे यांनी सर्वांना मदत मिळेल, असे आश्वासन दिले. पोलीस यंत्रणा प्रशासन आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Complete the damage panchnama immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.