पांढरा समुद्र ते मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:22 PM2020-09-12T17:22:32+5:302020-09-12T17:24:15+5:30
पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाऱ्याचे काम करत असताना येथील पूर्ण भागाचे संरक्षण होईल, यातून येथील पर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, याचा विचार करुन या बंधाऱ्याचे काम करा. तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिले.
रत्नागिरी : पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाऱ्याचे काम करत असताना येथील पूर्ण भागाचे संरक्षण होईल, यातून येथील पर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, याचा विचार करुन या बंधाऱ्याचे काम करा. तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिले.
अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाराबाबतच्या येथील ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी यांच्यासमवेत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी बोलत होते.
यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती महेश म्हाप, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, पतनचे कार्यकारी अभियंता एस्. ए. हुनरेकर, सहाय्यक अभियंता एस्. ए. चौधरी, मत्स्यविभागाचे देसाई यांच्यासह मुरुगवाडा, मिऱ्या, सडामिऱ्या येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे हा साडेतीन किलोमीटरचा बंधारा असून, महाराष्ट्रातील मोठा धूप प्रतिबंध प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम उत्तम गुणवत्तेसोबत जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्यात व पर्यटन विकासात भर टाकणारा आहे.
या प्रकल्पाचे काम दिमाखदार झाले पाहिजे. या कामामध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्यांसाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही यावेळी सामंत म्हणाले.