विद्यार्थ्यांचे शुल्क पूर्णत: माफ करा : सुशीलकुमार पावरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:35+5:302021-07-12T04:20:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा फी पूर्णत: माफ करावी, अशी मागणी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा फी पूर्णत: माफ करावी, अशी मागणी बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दापोलीचे गटशिक्षणाधिकारी बळवंतराव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन जिल्हा परिषदेचे माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनाही पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील जवळपास एक - दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या अनुषंगाने लॉकडाऊनमुळे कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील जनतेचे आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले होते. ज्याचा सर्वाधिक फटका विविध वर्गात, विद्याशाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बसला. त्यांना शाळेने, महाविद्यालयाने, विद्यापीठाने आकारलेले शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नाही.
तालुक्यातील लोकसंख्येचा विचार करता, हातावर पोट असणाऱ्यांची संख्या तुलनेने अधिक असल्याने त्यांच्या हाताला काम नाही. काही बांधव वर्षातील १२ महिने मोलमजुरी करूनच उदरनिर्वाह करतात. त्यामुळे पाल्याची फी भरण्यास ते पूर्णपणे असमर्थ आहेत. त्यातच मागील एक - दीड वर्षापासून कोरोना महामारीत रोजगार गेल्याने त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्याकरिता निवेदनाद्वारे विनंती आहे की, आपल्या अधिनस्त असलेल्या तालुक्यातील सर्वप्रकारच्या व्यवस्थापनांच्या शाळा / महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या अगदी पहिलीपासून ते पदवी, पदव्युत्तर शिक्षण, विविध व्यावसायिक शिक्षण, विविध विद्याशाखांत (वैद्यकीय, अभियांत्रिकी) शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा फी (वर्ष २०२०-२१ ते २०२१-२२) पूर्णत: माफ करण्याच्या सूचना संबंधित शाळा/महाविद्यालय प्रशासनाला द्याव्यात, अशी मागणी पावरा यांनी केली आहे.
110721\img-20210401-wa0011.jpg
परीक्षा फी सवलत दया - पावरा