तपासणीची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:41+5:302021-06-05T04:23:41+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव कोरोनाबाधित झाल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी तत्काळ कोरोनाची तपासणी करुन घ्यावी, अशी सूचना आरोग्य ...
रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव कोरोनाबाधित झाल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी तत्काळ कोरोनाची तपासणी करुन घ्यावी, अशी सूचना आरोग्य विभागातर्फे करण्यात आली आहे. मात्र, तरीही गुरुवारी सायंकाळपर्यंत कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी कोरोनाविषयक तपासणी करुन घेतली नाही.
ग्रामीण भागात गैरसोय
राजापूर : जिल्हा प्रशासनाने दि. ३ ते ९ जून या कालावधीत कडक लॉकडाऊनला सुरुवात केली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांनी सर्व वस्तूंचा साठा करुन ठेवला आहे. मात्र, ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे पोट हातावर असल्याने या लोकांची या काळात उपासमार होण्याची शक्यता आहे.
भरपाईची प्रतीक्षा अजूनही
राजापूर : तौक्ते चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेक घरांचे आणि झाडांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेला १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अजूनही कुठल्याही प्रकारे भरपाई मिळालेली नाही. विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन केवळ पोकळ आश्वासनेच दिली आहेत.
पिण्याच्या पाण्याची सोय
दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती. आमदार योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना, दापोलीतर्फे दररोज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नातेवाईकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
केअर सेंटरमध्ये फळवाटप
देवरुख : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या येथील शाखेतर्फे शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये विविध फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, उपशहराध्यक्ष शेखर नलावडे, मनविसेचे शहराध्यक्ष ऋतुराज देवरुखकर, स्वयंरोजगार सेलचे तालुका संघटक सनी प्रसादे, आदी उपस्थित होते.
वन विभाग क्षेत्रात वणवा
आवाशी : खेड तालुक्यातील सात्वीण गावात वन विभागाच्या मालकीची साडेचार एकर जागा आहे. या जागेत काही दिवसांपूर्वी अचानक वणवा लागल्याने त्यात वनौषधी वनस्पती, आंबा, काजू, खैराची झाडे तसेच सुके गवत जळून खाक झाले आहे. लोटे औद्योगिक क्षेत्राच्या अग्निशामक दलातील जवानांनी ही आग विझवली.
गादी वाफ्यावर पेरणी
मंडणगड : तालुक्यातील विन्हे येथील प्रयोगशील शेतकरी रुपेश पवार यांनी अपंगत्वावर मात करत शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. यावेळीही त्यांनी गादी वाफ्यावर भातपेरणीचा प्रयोग केला आहे. यासाठी त्यांना पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, पवन गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.
रक्तदान शिबिर
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने शिवसेनेच्या माध्यमातून वांद्रीच्या सरपंच अमिषा नागवेकर यांनी हे शिबिर आयोजित केले होते. यात अनेक दात्यांनी सहकार्य केले.
अन्नधान्य किटचे वाटप
रत्नागिरी : गरीब वयोवृद्ध, निराधार मोलमजूरी करणारे कामगार यांना रिलायन्स फाऊंडेशन आणि पाटीदार युवा मंडळाकडून अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. शहरातील एमआयडीसी, नाचणे, खेडशी येथे हे किट वितरीत करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील १५० कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचविण्यात आली.
आगारात मास्कवाटप
दापोली : केंद्र सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त व कोरोना काळातील सेवा सप्ताहानिमित्त तसेच परिवहन महामंडळाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त दापोली तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे दापोली आगारातील अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण
रत्नागिरी : आयडियल स्पोर्टस् अॅकॅडमी, लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन आणि इन्स्टिट्यूट फॉर चेस एक्सलंट यांच्यातर्फे अखिल भारतीय ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धा दि. ६ आणि ७ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रवेश मोफत असून, ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. विजेत्या, उपविजेत्यांना १० रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
रस्ते चकाचक
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून गावातील रस्त्यांची साफसफाई केली. सरपंच नंदू कदम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. रस्त्यालगतची गटारे तसेच रस्त्यावर आलेली खडी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून स्वच्छ केली.
खडी धोकादायक
देवरुख : देवरुख - तळेकांटे मार्गाचे काम सध्या सुरु आहे. पावसाळा जवळ आल्याने या कामाला पुन्हा खीळ बसणार आहे. सद्यस्थितीत वाशी फाटा ते भालेकरवाडी दरम्यान खडी पसरवून ठेवण्यात आली आहे. ही खडी वाहनचालकांसाठी धोकादायक ठरु लागली असून, वाहने घसरुन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
ज्येष्ठांचे लसीकरण
गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्ड या लसीची पहिली मात्रा देण्यात आली. पाटपन्हाळे हे गाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनही येथील नागरिकांना चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी लागत होती. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीमुळे पाटपन्हाळे केंद्र शाळेत लसीकरणाचे आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांना दिलासा
रत्नागिरी : दहावीनंतर आता बारावीची बोर्डाची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काही दिवसांपासून या निर्णयाबाबत सरकारचे तळ्यात-मळ्यात असे धोरण होते. त्यामुळे बारावीची मुलेही तणावाखाली होती. परंतु, आता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने या विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.